गौतम दत्ता

व्यवसाय क्षेत्र कोणतेही असले, तरी आता ‘डिजिटल परिवर्तन’ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा मंत्र बनला आहे. विमा आणि विशेषत: आयुर्विमा कंपन्याही याला अपवाद नाहीत. ग्राहकांना विमा घ्यायला लावण्याच्या काळापासून आता ग्राहक विमा खरेदीसाठी स्वत:हून येण्याच्या काळापर्यंत जे काही बदल या क्षेत्रात होत आहेत, त्यांत व्यवसाय आणि दावे निवारणाची प्रक्रिया, विक्री आणि ग्राहक सेवा या सर्वच बाबींसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संज्ञानात्मक आणि अनुभवी तंत्रज्ञान यांच्या वापरामुळे विमाधारकाच्या जोखमीचे मूल्यांकन, खरेदी प्रक्रियेचे व्यवस्थापन, पॉलिसी सेवा पुरविणे आणि दाव्यांचा निपटारा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.

तंत्रज्ञानाधारित नवीन संधी

बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निग आणि अ‍ॅनालिटिक्स यांसारख्या नवीन युगातील डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ग्राहक आणि त्यांच्या वर्तनाविषयी विमा कंपन्यांकडे मोठय़ा प्रमाणात माहिती जमा होत आहे. ग्राहकांच्या वर्तणुकीचे विश्लेषण केल्याने विमा कंपन्यांना ग्राहकांची जीवनशैली, त्यांच्या सवयी, प्राधान्ये आणि मनाचा कल समजून घेता येईल. त्यामुळे ग्राहकांच्या नेमक्या गरजांवर आधारित विमा उत्पादने आणि सेवा तयार करण्यात कंपन्यांना मोठी मदत मिळू शकते व त्यातून ग्राहकांचे जीवनही सुकर होऊ शकते.

याव्यतिरिक्त, विमा कंपन्या पॉलिसीची रचना आणि त्यांच्या किमतीबाबतचे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. तसेच फसवणुकीची प्रकरणे शोधू शकतात. विमा उद्योग आता अधिकाधिक माहितीसंलग्न होत चालला आहे. नवीन काळातील तंत्रज्ञान हे व्यवसाय आणि त्यातील सर्व भागधारकांसाठी मूल्य वाढविण्यास आवश्यक बनेल, याची मला खात्री वाटते.

ग्राहक आणि अन्य भागधारकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी विमा कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित ‘चॅटबॉट’चा वापर करीत आहेत. अर्थात मानवी कामकाजाचे महत्त्वही या कंपन्या जाणतात. बनावट दावे शोधण्यासाठी आणि व्यावसायिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीदेखील ‘चॅटबॉट्स’ वापरल्या जात आहेत. हे सर्व कमी खर्चात होत असून त्यातून कार्यक्षमताही सुधारत चालली आहे.

प्रगत ‘अल्गोरिदम’च्या वापरासह व्यवसायासंबंधी अंतर्दृष्टी प्रदान करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता यापुढील काळात प्रमुख भूमिका निभावेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करून घेऊन कंपन्या ग्राहकांच्या गरजा व वागण्याचे नमुने ओळखू शकतात. त्यानुसार ग्राहकांची गरजा भागविणारी सानुकूलित उत्पादने व सेवा त्या पुरवतील आणि ग्राहकांना अधिक कार्यक्षम व वैयक्तिकृत अनुभवांनी सक्षम करतील.

पॉलिसी खरेदी पारंपरिक ऑफलाइन की ऑनलाइन?

आजवर आयुर्विमा पॉलिसी या प्रामुख्याने वैयक्तिक एजंट्स, बँक भागीदार किंवा विमा दलालांसारख्या मध्यस्थांकडून विकल्या जात. हा कल आणखी काही काळ टिकेल; तथापि, तंत्रज्ञानात्मक परिवर्तन आणि डिजिटल व्यासपीठाचा प्रसार, यामुळे ऑनलाइन पद्धतीदेखील गतिमान होत असल्याचे आपण पाहत आहोत.

ऑनलाइन पर्यायांमुळे ग्राहकांना विमा कंपनीशी थेट संपर्क साधण्यास मदत होते. तसेच विविध उत्पादनांमध्ये त्यांना तुलना करता येऊन सर्वात योग्य अशी योजना स्वनिर्णयाने निवडता येते. कागदपत्रांचे डिजिटलायझेशन आणि त्यांची त्वरित पडताळणी यांमुळे ग्राहकांना विमा पॉलिसी जलद आणि सहजपणे खरेदी करता येते. म्हणूनच सध्या आयुर्विमा पॉलिसींच्या ऑनलाइन खरेदीला गती मिळत आहे. ग्राहक विमा पॉलिसी ऑनलाइन खरेदी करीत असताना त्यांच्या मदतीसाठी ‘चॅटबॉट’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा आधार कंपन्या सर्व टप्प्यांवर देऊ करीत आहेत.

(लेखक बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य माहिती व डिजिटल अधिकारी)