खाणकाम क्षेत्रातील उद्योगसमूह वेदान्तने, खासगीकरण होऊ घातलेल्या सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेश लिमिटेडच्या (बीपीसीएल) खरेदीसाठी प्रारंभिक इरादापत्र दाखल केले आहे. या कंपनीतील सरकारचा संपूर्ण भागभांडवली हिस्सा खरेदी करण्यात तिने स्वारस्य दाखविले आहे.

वेदान्त लिमिटेड या भारताच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीने लंडनस्थित वेदान्त रिसोर्सेस या पालक कंपनीसह संयुक्तपणे बीपीसीएलसाठी बोली लावण्याच्या १६ नोव्हेंबर या अंतिम तारखेपूर्वी हे इरादापत्र दाखल केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार विदेशी कंपन्यादेखील या लिलाव प्रक्रियेत स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत.

बीपीसीएलसाठी वेदान्तचे इरादापत्र हे प्रारंभिक टप्प्यावरील असल्याचे वेदान्तने अधिकृतपणे प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. कंपनीच्या विद्यमान तेल आणि वायू व्यवसायाशी संबंधित हे पाऊल पडले असून, भविष्यात ते उपयुक्त ठरेल, असा विश्वास या निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.

वेदान्तने दशकभरापूर्वी केर्न इंडिया तेल निर्मात्या कंपनीवर ८.६७ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात अधिग्रहण करून, तेल आणि वायू क्षेत्रातील स्वारस्य दाखविले आहे. केर्न इंडिया ही राजस्थानातील तेल साठय़ातून कच्चे तेलाचे उत्पादन घेत असून, त्याच क्षेत्रात कार्यरत बीपीसीएलच्या शुद्धीकरण प्रकल्पातून त्यायोगे पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधन तयार केले जात आहे. बीपीसीएल ताब्यात घेऊन, तेल उत्खनन, शुद्धीकरण आणि वितरण या संपूर्ण मूल्य शृंखलेत पाय पसरण्याची संधी वेदान्तला खुणावत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने निर्गुंतवणूक कार्यक्रमाअंतर्गत, बीपीसीएल या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तेल विपणन कंपनीमधील संपूर्ण ५२.९८ टक्के भागभांडवल विकून तिचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. मूळ नियोजनाप्रमाणे सरकारला यातून अपेक्षित असलेली किमत मात्र समभागात निरंतर पडझड सुरू असल्यामुळे लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. बुधवारच्या भांडवली बाजारातील बीपीसीएलच्या समभागाचे ३८३.३० रुपये ही किमत पाहता, सरकारी हिश्शाचे मूल्यांकन हे ४४,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असेल.