सरलेल्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराने विक्रमी नीचांक पातळी दाखविल्यानंतर, किमतीतील हा उतार ऑगस्टमध्ये सुरू राहिल्याचे दिसून येईल, असे कयास बांधले जात आहेत. परिणामी २९ सप्टेंबरच्या नियोजित पतधोरण आढाव्याच्या बैठकीत रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात शक्य आहे, असा आघाडीच्या दलालपेढय़ांचा होरा आहे.
महागाई निर्देशांकांचे बुधवारी प्रसिद्ध झालेले आकडे हे केवळ मागच्या वर्षांच्या तुलनेत घसरल्याचे दाखवत नाहीत, तर एकूण किमती खालावल्याचे ते द्योतक आहेत, असे मत बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच, डीबीएस आणि एसबीआय रिसर्च यांच्या अहवालात मांडण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१६ पर्यंत ग्राहक किंमत निर्देशांक ६ टक्क्यांखाली येणे अपेक्षिले आहे. प्रत्यक्षात बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार हा निर्देशांक जुलैमध्ये ३.७८ टक्के अशा बहुवार्षिक नीचांकपदावर आला आहे. मुख्यत: घसरलेल्या अन्नधान्याच्या किमती, तसेच फळे, भाज्या व कडधान्याच्या किमतीतील उताराचे या निर्देशांकात घसरणीत प्रमुख योगदान राहिले आहे.
त्यामुळे २९ सप्टेंबर व त्यापुढे २ फेब्रुवारीच्या नियोजित पतधोरण आढाव्यांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात एकूण अर्धा टक्क्यांची कपात होईल असे खात्रीने सांगता येईल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल-लिंचच्या टिपणांने नमूद केले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जर एकूण अर्थस्थितीत सुधाराचे सुस्पष्ट संकेत दिसून आल्यास आणि पाऊसपाणी बऱ्यापैकी दिसल्यास कोणत्याही क्षणी दर कपात केली जाऊ शकेल, असे ३ ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यानंतर स्पष्ट केले आहे. बुधवारीच ग्राहक किंमत निर्देशांकातील बहुवार्षिक उतारासह, औद्योगिक उत्पादन दरही उंचावल्याचे आढळून आले आहे.