चांगल्या ‘मान्सून’च्या अपेक्षेने बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचा कयास

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महागाई वाढण्याबाबतची भीती व्यक्त करतानाच यंदा पावसाचा हंगाम चांगला राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँक ऑगस्टमध्ये पाव टक्का दर कपात करू शकेल, असा विश्वास ‘बँक ऑफ अमेरिका – मेरिल लिंच’ने या दलाली संस्थेने व्यक्त केला आहे.

यंदाच्या मोसमात मान्सून सरासरीइतकाच राहिला तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीला तिच्या ऑगस्टमधील पतधोरणात रेपो दरात पाव टक्का  कपात सहज शक्य आहे, असे बँकेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. एप्रिल ते जून दरम्यान महागाई दर मात्र ५.४ टक्के राहण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.

डिसेंबर २०१७ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी २०१८ मध्ये महागाई दर काहीसा नरम होत असल्याचे आकडे सोमवारीच जाहीर झाले. अमेरिकी बँकेच्या अंदाजानुसार फेब्रुवारीचा महागाई दर आणखी कमी होत तो ४.७ टक्क्यांवर येईल.

अर्थसंकल्पातील खरीप कृषी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याच्या तरतुदीमुळे महागाईचा विपरीत परिणाम काही काळ जाणवण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. पुढील संपूर्ण वित्त वर्षांकरिता महागाई दराचा अंदाज ४.८ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने पुढील पहिल्या अर्ध वित्त वर्षांत महागाईचा दर ५.१ ते ५.६ टक्के असेल म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सहाव्या द्विमासिक पतधोरणात प्रमुख दरात कोणतेही बदल केले नव्हते.