आपल्या अर्थव्यवस्थेत चलनवाढीचा कल घसरता आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर २०१२ सालात जो १० टक्क्यांवर होता, तो गेल्या तीन वर्षांत सरासरी ५.२ टक्क्यांवर आला आहे. एप्रिल २०१७ मध्ये तर हा दर २.९९ टक्क्यांपर्यंत खाली आला. आकस्मिक काही घडले नाही, तर चलनवाढ नजीकच्या तसेच मध्यम कालावधीत वाढणे संभव नाही. अपेक्षेप्रमाणे पावसाळा संपूर्ण हंगाम बरसत राहिल्यास, महागाई दरात आणखी उताराची शक्यता आहे. दुसरीकडे आपल्या वित्तीय व्यवस्थेत मुबलक तरलता आहे. कर्जमागणीत वाढ थंडावलेली आहे. याचा एकंदर परिणाम म्हणजे व्याज दराबाबत सध्या दिसतो त्याप्रमाणे घसरणीचा कल राहील. बँकांनी ठेवींवरील व्याजाचे दर कमी केलेच आहेत. कर्ज स्वस्ताईही दिसून येत आहे. घरांसाठी कर्ज सध्या ८.४ टक्क्यांच्या आसपास उपलब्ध होत आहे. कर्जदारांसाठी ही बाब आनंदाचीच! तथापि व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांसाठी मात्र हा शुभसंकेत निश्चितच नाही. मुख्यत: ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांच्या बँकेतील ठेवींवरील परतावा घटत चालला आहे. यातून काही मार्ग दिसतो काय?

वास्तविक व्याजाचा दर काय, हा या प्रकरणी सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. वास्तविक व्याजाचा दर म्हणजे प्रचलित प्रातिनिधिक व्याज दर वजा चलनवाढीचा दर यातील फरक होय. अर्थात पाच वर्षांपूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत सध्या वास्तविक व्याजदरात सुधार जरूर झाला आहे. २०१२ मध्ये बँकेत १ वर्ष मुदतीच्या ठेवींसाठी ९ टक्के व्याजदर मिळत होता, तर चलनवाढीचा दर १० टक्के होता. त्यामुळे वास्तविक व्याजदर हा (९-१० = -१) उणे पातळीवर होता. आता सरासरी किरकोळ चलनवाढीचा दर ५ टक्के, तर अलीकडच्या कपातीनंतर ठेवींवरील व्याजदर ६.७५ टक् के आहे. त्यामुळे वास्तविक व्याज दर हा ६.७५-५ = १.७५ असा तुलनेने सकारात्मक पातळीवर आहे. यातून असे म्हणता येईल की, पाच वर्षांपूर्वीपेक्षा आता ठेवीदार चांगल्या स्थितीत आहेत; परंतु बचतकर्त्यांसाठी, विशेषत: व्याज उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या वृद्ध सेवानिवृत्तांसाठी हा खोटा दिलासा ठरेल. त्यांच्यासाठी, मासिक परतावा अर्थातच कमी झाला आहे आणि महागाईतील घट ही प्रत्यक्षात वस्तूंच्या किमतीत प्रतिबिंबित होत असल्याचेही दिसून येत नाही, तर मग, कमी व्याज दर आणि जीवनावश्यक खर्चात निरंतर वाढ अशा कठीण परिस्थितीचा सामना कसा करता येईल?

एक लक्षणीय गोष्ट म्हणजे, जेव्हा कर्जावरील व्याज दर खाली येतात तेव्हा कर्जरोख्यांशी संलग्न डेट फंड चांगले उत्पन्न मिळवतात. कर्जरोख्यांच्या किमती आणि व्याज दर यांचे नातेच असे विपरीत असते. व्याजाचे दर घटल्यासरशी रोख्यांच्या वाढणाऱ्या किमती चांगला परतावा मिळवून देतात. गेली साडेतीन-चार वर्षे व्याज दरातील घसरणीचा कल रोख्यांच्या किमतींच्या पथ्यावर पडला असून, डेट फंडांच्या गुंतवणूकदारांसाठी हे लाभदायी ठरले आहे.

परिस्थितीजन्य लवचीकतेकडून रिझव्‍‌र्ह बँकेने आपला पतधोरणविषयक रोख तटस्थतेकडे वळविला आहे. त्यामुळे यापुढे व्याजाच्या दरात बदल घडेल अथवा घडणारही नाही. याचा अर्थ असाही की, गेल्या चार वर्षांत आकर्षक ठरलेली रोखे गुंतवणूक यापुढे तितकीशी आकर्षक ठरणार नाही; तथापि डेट फंडांमधील काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक, विशेषत: उच्च करदायित्व असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा मिळवून देणारीही ठरली आहे.

सध्याचा ठेवींवरील ६.७५ टक्क्यांचा व्याज दर हा १० टक्के प्राप्तिकराच्या टप्प्यांतील गुंतवणूकदारांसाठी करपश्चात ६.०८ टक्क्यांचा वास्तविक परतावा मिळवून देईल, तर २० टक्के आणि ३० टक्के अशा उच्च प्राप्तिकराच्या टप्प्यांतील गुंतवणूकदारांसाठी वास्तविक परतावा यापेक्षा खूप कमी असेल. त्यामुळे अशा मंडळींसाठी डेट फंड लाभदायी ठरतील.

आता महत्त्वाचा प्रश्न डेट फंडाची निवड कशी करावी? गुंतवणुकीसाठी उपलब्ध अथवा धारणा कालावधीवर हे अवलंबून असेल. हा कालावधी अल्पकालीन (काही महिने) असेल तर अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड चांगला पर्याय असेल, तर शॉर्ट टर्म फंड हे मध्यमकालीन धारणेसाठी उत्तम आहेत. दीर्घ मुदतीसाठी, इन्कम फंड आदर्श ठरतील. डायनॅमिक बाँड फंडांमध्ये गुंतवणूक कोणत्याही वेळी केली जाऊ  शकते. ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे त्यांना एमआयपी (मासिक उत्पन्न योजना) विचारात घेता येईल. एमआयपी हे असे डेट फंड आहेत जे ८० टक्के निधी उच्च दर्जाच्या बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये गुंतवितात. शिल्लक असलेला २० टक्के निधी ब्लूचिप समभागांमध्ये गुंतविला जातो ज्यामुळे दीर्घकाळामध्ये उत्तम परतावा मिळतो. एमआयपी गुंतवणूक कर-कार्यक्षमही आहे. दीर्घकालीन कर दर (जर किमान ३६ महिने गुंतवणूक असेल तर) फक्त १० टक्के इंडेक्सेशनशिवाय आणि इंडेक्सेशनसह २० टक्के इतका येईल.

म्हणूनच व्याज उत्पन्नावर अवलंबून असलेल्या बचतकर्त्यांना त्यांच्या बँक ठेवीतील रकमेचा काही भाग एमआयपी किंवा अन्य डेट फंडांकडे वळविण्याचा विचार करता येऊ  शकेल. बँक ठेवींमधून येणाऱ्या कमी व्याज उत्पन्नाची यातून भरपाई होईल.

डेट फंडांचा पर्याय कसा?

बहुतेक कुटुंबांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा नियमित आणि विसंबून राहता येईल अशा हमखास परताव्यासाठी बँक ठेवींमध्ये पैसा गुंतविण्याकडे कल असतो. मात्र प्राप्त परिस्थितीत बचतकर्त्यांच्या या समूहाला थोडय़ा वेगळ्या वळणाचा विचार क्रमप्राप्तच ठरेल, जेणेकरून अधिक चांगले परतावा देतील अशा डेट फंडांसारख्या किंवा इतर मालमत्ता वर्गाचा त्यांना विचार करणे भाग ठरेल.

(लेखक जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक-नीतिज्ञ)