महागाई दरातील दिलासादायी नरमाईने

वर्षांच्या उत्तरार्धात सणोत्सवाच्या हंगामात वाढणाऱ्या मागणीने जशी भीती व्यक्त करण्यात आली होती, त्याच्या विपरीत महागाई दर नरमला असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित काळात म्हणजे निदान मार्चअखेपर्यंत तरी व्याजदरात कोणत्याही फेरबदलाची शक्यता धूसरच असल्याचा निर्वाळा एका अहवालाने दिला आहे.

सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०१८ अखेर किरकोळ किमती आधारित ग्राहक किंमत निर्देशांक हा वार्षिक तळाला म्हणजे ३.३१ टक्के पातळीवर नोंदविण्यात आला. सप्टेंबर २०१८ मधील ३.७ टक्क्य़ांच्या तुलनेत त्यात घसरण होतीच, शिवाय ऑक्टोबर २०१७ मधील ३.५८ टक्क्य़ांच्या स्तरापेक्षा तो कमी नोंदविला गेला.

व्याजदर निर्धारणासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दराची पातळीच लक्षात घेतली जाते. ती संपूर्ण अर्ध वर्षांत समाधानकारक पातळीवरच राहिली असून, ऑक्टोबरमध्ये तर तिने वर्षांतील नीचांकाला वळण घेतले. यातून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समिती अर्थात एमपीसीने रेपो दराशी छेडछाड करण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. किंबहुना मार्च २०१९ पर्यंत तरी व्याजदरात वाढीची कोणतीही शक्यता दिसून येत नाही, असा कोटक सिक्युरिटीजच्या संशोधन अहवालाचा कयास आहे.

आगामी काही महिन्यांत किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर २.८ टक्के ते ४.३ टक्क्य़ांदरम्यान म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने सुसह्य़ पातळीवर राहण्याची शक्यता या अहवालाने व्यक्त केली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने ऑक्टोबरमधील पतधोरणाच्या द्विमासिक आढावा बैठकीत, व्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर त्याआधीच्या सलग दोन पतधोरण बैठकांमध्ये रेपो दरात प्रत्येकी पाव टक्क्य़ांची वाढ करीत तो मध्यवर्ती बँकेने ६.५ टक्क्य़ांच्या पातळीवर आणला आहे.

अर्थात कृषी उत्पादनांना वाढवून दिलेला किमान हमीभाव, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचे विपरीत वळण, जागतिक वित्तीय बाजारपेठेतील अस्थिरता, रुपयाची डॉलरच्या तुलनेत अशक्तता, तर वेतन आयोगानुसार राज्यांकडून घरभाडे भत्त्यात वाढीची अंमलबजावणी यांचा महागाई दरावरील परिणाम अद्याप स्पष्ट व्हायचे आहेत. त्यावर लक्ष ठेवावे लागेल, असेही या अहवालाचे निरीक्षण आहे. तथापि अन्नधान्यातील महागाईचा दर हा तूर्तास तरी निरुपद्रवी भासत असून, त्या परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजाचे दर वाढवावेत इतकी भयानकता त्यातून गाठली जाणार नाही, असा निर्वाळा या अहवालाने दिला आहे.