News Flash

व्याजदर कपातीला वाव!

घाऊक महागाई दर ३.७४ टक्के

| September 15, 2016 03:40 am

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर आगामी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत ५ टक्क्यांखाली घसरण्याची दाट शक्यता असून, त्या परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुढील तीन महिन्यांत व्याजदर कपातीच्या शक्यतेला लक्षात घेऊ शकेल, असा सिंगापूरस्थित जागतिक वित्तीय सेवा संस्था ‘डीबीएस’ने कयास व्यक्त केला आहे.

भाज्या तसेच अन्य खाद्यान्न किमतीत उतार नोंदला गेल्याने सरलेल्या ऑगस्ट महिन्यातील किरकोळ किमतींवर आधारित महागाई दर हा पाच महिन्यांच्या तळात म्हणजे ५.०५ टक्के पातळीवर विसावल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर आकडेवारीतून स्पष्ट झाले. महागाई दराचा हा निरुपद्रवी स्तर पाहता, नव्याने स्थापित पतधोरणविषयक समितीचा कल हा व्याजदर कपातीकडे झुकणारा असेल, असे डीबीएसने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मत नोंदविले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या ४ ऑक्टोबरला द्वैमासिक पतधोरण आढाव्याची बैठक होत आहे. नवीन गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांचे ते पहिलेच पतधोरण असेल. व्याजदर कपातीला विलंब केल्याच्या टीकेला आधीचे गव्हर्नर रघुराम राजन यांना सामोरे जावे लागले आहे. ही बाबदेखील डॉ. पटेल कोणताही निर्णय घेण्याआधी ध्यानात घेतील, असे डीबीएसचे म्हणणे आहे.

डीबीएसच्या मते, नजीकच्या काळात घाऊक किमतींवर आधारित महागाई दर (डब्ल्यूपीआय) आणि किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर (सीपीआय) यातील अंतर संपुष्टात येऊन, घाऊक महागाई दर वरचढ ठरल्याचे लवकरच दिसेल. २०११ सालात दिसून आलेला हा प्रवाह पुन्हा अनुभवास येईल, असा तिचा कयास आहे.

पाऊस अपेक्षेप्रमाणे देशात सर्वत्र चांगला झाला. धरण-कालवे आणि भूगर्भातील जलसाठाही चांगला असल्याने खरिपाची पिकेही चांगली येण्याची आशा आहे. चालू हंगामातही एकूण पेरणी झालेले क्षेत्र हे गेल्या वर्षांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढलेले आहे. त्यातही डाळींचे लागवड क्षेत्र दमदार ३६ टक्क्यांनी, भात लागवड १४ टक्क्यांनी तसेच कडधान्य व तेलबियांच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे. हे घटक महागाई दरात घसरणीस कारणीभूत ठरतील, असे या वित्तसंस्थेचे म्हणणे आहे.

अर्थतज्ज्ञ तसेच काही बँकप्रमुखांनीही ४ ऑक्टोबरच्या पतधोरणातून जरी व्याज दरकपात झाली नाही तरी डिसेंबपर्यंत किमान पाव टक्का दरकपात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. महागाईचा दराचा पाच टक्के हा स्तर रिझव्‍‌र्ह बँक तसेच सरकारच्या सहनशील मर्यादेत आहे. त्यातच कारखानदारी व उद्योग क्षेत्रातून गुंतवणुकीचा स्तर दाखविणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील जुलैमधील संकोच पाहता व्याज दरकपातीला आता वाव असल्याचे मानले जात आहे.

घाऊक महागाई दर .७४ टक्के

  • ऑगस्टच्या दराने दोन वर्षांपूर्वीचा उच्चांक मोडीत

डाळींसह काही अन्न घटक तसेच उत्पादित वस्तूंच्या किमतींनी उचल घेतल्याने, सरलेल्या ऑगस्टमधील घाऊक किमतींवर आधारीत महागाई दराने (डब्ल्यूपीआय) ३.७४ टक्के अशा दोन वर्षांपूर्वीच्या उच्चांक पातळीला गाठले आहे. प्रमुख वस्तू, उत्पादने व सेवांमधील वार्षिक किंमतवाढ दर्शविणारा हा दर जुलैमध्ये ३.५५ टक्के होता. तर गतवर्षी ऑगस्ट २०१५ मध्ये तो (उणे) -५.०६ टक्के असा होता. यापूर्वी ३.७४ टक्के असा घाऊक महागाईचा स्तर ऑगस्ट २०१४ मध्ये आढळून आला होता. नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१६ पर्यंत हा महागाई दर उणे पातळीवर कायम होता.

उल्लेखनीय म्हणजे भाज्या व फळांच्या घाऊक किमती या ऑगस्टमध्ये ०.१७ टक्क्यांनी थंडावल्या आहेत. आधीच्या जुलै महिन्यात मात्र त्या २८.०५ टक्क्यांनी वधारल्या होत्या. कांद्याच्या किमतीही ऑगस्टमध्ये तब्बल ६४.१९ टक्क्यांनी ओसरल्या.

त्याउलट डाळींच्या किमती ऑगस्टमध्ये तब्बल ३४.५५ टक्क्यांनी, दैनंदिन आहाराचा घटक असलेल्या बटाटय़ाच्या किमती ६६.७२ टक्क्यांनी वधारल्याचे आढळले. एकूण महागाई दर उंचावण्यामागे हे दोन घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरले. साखरेच्या किमती ३५.३६ टक्क्यांनी, तर फळेही १३.९१ टक्क्यांनी कडाडली. तथापि एकंदर अन्नधान्य घटकांमधील महागाई दर जुलैमधील ११.८२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ८.२३ टक्क्यांवर रोडावल्याचे आढळून आले. पेट्रोल (-८.६५), खनिजे (-३.४४ टक्के) यांच्या किमतीतील निरंतर नकारात्मकता ऑगस्टमध्येही कायम होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 3:40 am

Web Title: interest rates cut chances increased says dbs
Next Stories
1 मोन्सॅन्टो अखेर बायरच्या ताब्यात!
2 सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ वाढ
3 चार नव्या शाखांसह ‘चोला’चा राज्यात विस्तार
Just Now!
X