रिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून पतधोरण बैठक

देशावरील वाढत्या महागाईचे वादळ पुढील वित्त वर्षांतही घोंघावण्याची शक्यता गृहित धरून रिझव्‍‌र्ह बँक यंदाही, सलग तिसऱ्यांदा व्याजदर कपात टाळण्याची अटकळ आहे. डिसेंबर २०१७ अखेर महागाई दर ५.२१ टक्के नोंदला गेला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवार, ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीतील निर्णय बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.

गेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचे हे पहिले द्विमासिक पतधोरण आहे. चालू वित्त वर्षांतील ते सहावे द्विमासिक पतधोरण असेल. या बैठकीत घेतले जाणाऱ्या आढाव्यात यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींचे चित्र असेल.

चालू वित्त वर्षांकरिता महागाईच्या ६.७ टक्के अंदाज वर्तविणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेला पुढील वित्त वर्षांत खरिप पिकाला दीडपट अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित केल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची भीती आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून विकास दराबाबतच्या अंदाजाची उत्सुकता उद्योग क्षेत्राला आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्यापारी बँकांनी कर्जावरील व्याजदर स्थिर ठेवत ठेवींवरील दर काही प्रमाणात कमी करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्याच आठवडय़ात अमेरिकी फेडरलच्या मावळत्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनीही स्थिर व्याजदराचे त्यांच्या देशाचे पतधोरण जाहीर केले होते.

रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या दोन्ही द्विमासिक पतधोरणात व्याजदराबाबत कोणतेही बदल केलेले नाहीत. ऑगस्ट २०१७ मध्ये यापूर्वीची शेवटची दर कपात करताना रेपो दर ६ टक्के असा गेल्या हा वर्षांतील किमान स्तरावर आणून ठेवण्यात आले होते. अनेक पतमानांकन संस्थांनीही यंदा दर स्थिर राहण्याबाबतची आशाच अधिकतर प्रमाणात व्यक्त केली आहे.