अमेरिकेची बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी मास्टरकार्डने मंगळवारी भारतावरील कोविड-१९ वाढीच्या संकटात दिलासा म्हणून एक कोटी डॉलरचे (भारतीय चलनात जवळपास ७५ कोटी रुपये) अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.

मास्टरकार्ड इम्पॅक्ट फंडाच्या माध्यमातून हे योगदान तीन प्राधान्य क्षेत्रावर केंद्रीत केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयातील संसाधन, अतिरिक्त प्राणवायू पुरवठा आणि देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी साहाय्यभूत कार्य या अनुषंगाने हे योगदान असेल.

मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, आरोग्याबाबत भारताची स्थिती सध्या मोठी आव्हानात्मक आहे. तेथील प्रत्येकजण हा सध्या संकटातून जात आहे. भारतातील जनता, कर्मचारी यांचे अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणून आम्ही सदैव पाठीराखे राहिले आहोत. मात्र आता वेळ आली आहे ती खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची. आणि या संकटातून संपूर्ण भारताला मदत करण्यासाठी आपण जे काही करू शकतो, ते निश्चितच करू.

बंगा हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्वरित आरोग्य सेवा पुरवू शकतील अशा छोटेखानी रुग्णालयांच्या स्थापनेद्वारे एकूण २,००० खाटांची उपलब्धतता करून दिली जाणार आहे. सरकार आणि स्थानिक भागीदारांच्या मदतीने अशी रुग्णालये त्वरित तयार केली जातील.