आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराने गेल्या आठ महिन्यांतील तळ गाठला असताना मुंबईच्या सराफा बाजारातही मौल्यवान धातू नव्याने चार महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला. सोने दर तोळ्यासाठी २६ हजारांपासून अधिक लांब गेले असून चांदी तर किलोमागे थेट ३५ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे.
दर कपात धोरणाबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या सुरू झालेल्या बैठकीकडे डोळे लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतणूकदारांनी मौल्यवान धातूची विक्री केली. परिणामी लंडनच्या बाजारात सलग चौथ्या दिवशी सोने खाली आले. तेथे आता प्रति औन्स १,१४३ डॉलरचा भाव सुरू आहे. एप्रिलमधील सर्वोच्च टप्प्यावर पोहोचलेल्या सोने दराचा हा किमान स्तर आहे.
शहरातील सोने-चांदीच्या दरांमध्येही गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरण होत आहे. सोने दराने त्याचा तोळ्याचा २६ हजारी भाव दोनच दिवसांपूर्वी मागे टाकला. गुरुवारी त्यात १७५ रुपयांची घसरण येत सोने १० ग्रॅमसाठी २५,७८५ रुपयांपर्यंत उतरले. तर चांदीच्या दरात किलोमागे एकदम ६४५ रुपयांचा उतार आल्याने पांढरा धातू ३५,०२५ रुपयांवर आला आहे.

यंदाच्या वर्षांत दोन गुरुपुष्यामृत योग असल्याने सोने बाजारात खरेदीदारांचा उत्साह टिकून आहे. गुंतवणूक म्हणून नाण्याबरोबरच वळ्यांनाही मागणी आहे. सिंहस्थाचे दोन महिने संपल्यानंतर पुन्हा एकदा लग्नसराई तसेच दसरा-दिवाळीच्या निमित्ताने सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या खरेदीचा कल वाढू शकतो.
– अमित मोडक,
कमॉडिटी तज्ज्ञ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स