वाढत्या बुडीत कर्जाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कान टोचले
सर्व विकसनशील देशांमध्ये भारत हा सवरेत्कृष्ट देश असला तरी येथील सार्वजनिक बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जचिंतेत या देशाने अधिक लक्ष घालावे, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या वतीने मुंबईतील मुख्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वित्तीय सल्लागार जोस विनल्स यांनी उपस्थिती दर्शविली. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हेही या वेळी उपस्थित होते.
विकसनशील देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था उत्तम असल्याची पावती विनल्स यांनी या वेळी दिली. मात्र त्याचबरोबर देशातील विविध कंपन्यांचा ताळेबंद तसेच सार्वजनिक बँकांच्या मालमत्ता गुणवत्तेबाबतची चिंता व्यक्त केली.
कंपन्यांची वित्तीय स्थिती आणि सार्वजनिक बँकांमधील मालमत्ता गुणवत्ता या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारीतील जोखीम असल्याचे नमूद करत विनल्स यांनी वित्तीय स्थिरतेला संबोधित करण्याची गरज प्रतिपादन केली. शाश्वत विकास, नियंत्रित महागाई, वित्तीय बाजूंवर लक्ष देण्याची आवश्यकताही त्यांनी या वेळी मांडली. कंपन्यांचे वाढते कर्ज आणि सार्वजनिक बँकांचा ताळेबंद याबाबत प्राधान्याने कृती करायला हवी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टाइन लेगार्ड या गुरुवारी भारत दौऱ्यावर आल्या. दक्षिण आशियाई क्षेत्रीय प्रशिक्षण आणि तांत्रिक साहाय्यता केंद्र उभारणीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर करावयाच्या स्वाक्षरी प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारीच मान्यता दिली.