मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणाच्या महाराष्ट्र पोलिसांच्या प्रयत्नांना योगदान म्हणून जॉइस्टर या खासगी ब्रॉडबॅण्ड सेवा प्रदात्या कंपनीने मोफत वाय-फाय सेवा देण्याची घोषणा केली आहे.
मुंबई तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय, मुंबई-ठाणे वाहतूक पोलीस मुख्यालये, राज्य पोलिस महासंचालनालयासह, या जिल्ह्य़ातील अनेक पालिका रुग्णालये आणि प्रमुख १५ महाविद्यालयांमध्ये कंपनीची ही वाय-फाय सेवा सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व प्रमुख पोलीस ठाण्यांना या सेवा जाळ्यात सामावून घेतले जाणार आहे.
जॉइस्टरने ही वाय-फाय सेवा त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतून योजली असून, पोलिस दलाने त्याचे स्वागत करताना, लवकरच अधिकाधिक पोलीस स्थानकांमध्ये ती राबविण्याची तयारी दर्शविली आहे. जॉइस्टरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निकुंज कम्पानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवात म्हणून राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रे ही ब्रॉडबॅण्ड इंटरनेटने जोडण्याची योजना आहे. त्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि तेथे येणारे सामान्य नागरिक दोहोंना या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेता येईल, असे कम्पानी यांनी स्पष्ट केले.