मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्या यांच्यावर जागतिक अटक वॉरंट जारी करण्यापूर्वी इंटरपोलने भारताच्या सक्तवसुली संचालनालयाला काही बाबतीत स्पष्टीकरणे विचारली आहेत.
काही बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणात मल्या यांची सक्तवसुली संचालनालय चौकशी करीत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेच्या पथकांनी मल्या यांच्याविरोधात नेमकी काय प्रक्रिया करण्यात आली आहे याची माहिती मागवली आहे, ती माहिती रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी आवश्यक आहे.
आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्या यांनी बुडवले असून त्याची चौकशी सीबीआय करीत आहे. सक्तवसुली संचालनालयाची विनंती फेटाळण्यात आलेली नाही, पण काही स्पष्टीकरणे मागितली गेली आहेत, ती द्यावी लागणार आहेत. मल्या हे २ मार्चला भारतातून ब्रिटनला निघून गेले आहेत.
रेड कॉर्नर नोटीस ही आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी बजावली जात असते. ती नोटीस बजावल्यानंतर इंटरपोल जगाच्या कुठल्याही भागातून संबंधितास अटक करू शकते व देशाच्या हवाली करू शकते.
ब्रिटिश सरकारने याआधी असे म्हटले होते, की मल्या यांच्याविरोधातील आरोप गंभीर आहेत हे आम्ही मान्य करतो, तसेच भारत सरकारला मल्या यांच्या चौकशीत मदत करण्याची आमची तयारी आहे. सक्तवसुली संचालनालय मल्या यांच्या १४०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या विचारात आहे.
ललित मोदी प्रकरणातही इंटरपोलने माहिती मागवली होती व संबंधित प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरणे मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सरकार ग्वाहीने बँक समभागांना ऊर्जा
मुंबई : बुडीत कर्जाबाबत देशातील सार्वजनिक बँकांचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोमवारी दिल्यानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या बँक समभागांच्या मूल्यांना बळ मिळाले. बँकांच्या पुनर्भाडवलानेही समभाग हुरळून जात ते ३ टक्क्यांपर्यंत भक्कम झाले. बँकांना चालू आर्थिक वर्षांत ठरविल्याप्रमाणे २५,००० कोटींचे भांडवल पुरविले जाईल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक बँकप्रमुखांशी सोमवारी झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्र्यांनी बँक व्यवस्थापन प्रमुखांची संघटना – इंडियन बँक्स असोसिएशन ही बुडीत कर्जाच्या प्रश्नात लक्ष घालेल, असे स्पष्ट केले.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स : +२.८५%
युनियन बँक ऑफ इंडिया : +२.५२%
बँक ऑफ बडोदा : १.९६%
आंध्रा बँक : १.९६%
अलाहाबाद बँक : १.३८%
स्टेट बँक : १.३०%
पंजाब नॅशनल बँक : १.१२%
आयडीबीआय बँक : १.०९%