म्युच्युअल फंड मालमत्ता वाढून २४ लाख कोटींपुढे

चालू वर्षांत अस्थिर भांडवली बाजार आणि समभागांतून बहुतांश नकारात्मक परतावा राहिला असला तरी, नियोजनबद्ध गुंतवणूक योजना अर्थात ‘एसआयपी’तील निधी ओघ कायम राहिल्याने म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता नोव्हेंबरअखेर वाढली आहे. म्युच्युअल फंड मालमत्ता ८ टक्क्यांनी वाढून २४.०३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

सर्व फंड योजनांमधील ऑक्टोबरमधील गुंतवणुकीत गेल्या महिन्यात १.४२ लाख कोटी रुपये भर पडली आहे. ऑक्टोबरमधील ३५,५०० कोटी रुपयांच्या वाढीच्या तुलनेत यंदा लक्षणी वाढ झाली आहे.

संपत्तीवाढीसह गुंतवणूकदार फंड पर्याय पुढील वर्षीही कायम ठेवतील, असा विश्वास फंड उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ या संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे मुख्य कार्यकारी एन. एस. व्यंकटेश यांनी, वेगवान भारतीय अर्थव्यवस्था आणि कमी होत असलेली महागाई यामुळे नजीकच्या भविष्यात समभागांची कामगिरी पुढील वर्षांतही उत्तम असेल, असे म्हटले आहे.

देशात ४२ फंड घराणी आहेत. त्यांच्यामार्फत ऑक्टोबरमध्ये २२.२३ लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन झाले होते. ते आता २४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. तर वर्षभरापूर्वी ही रक्कम २२.७९ लाख कोटी रुपये होती.

लिक्विड फंडांसह समभाग आणि संमभाग संलग्न बचत योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल नोंदला गेला आहे. लिक्विड फंडांमध्ये गेल्या महिन्यात १.३६ लाख कोटी रुपये, समभाग फंडांमध्ये ८,४०० कोटी रुपये, तर समभाग संलग्न बचत योजनांमध्ये २१५ कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने निधीऱ्हास नोंदला जाणाऱ्या गोल्ड ईटीएफमध्ये यंदा १० कोटी रुपये आले आहेत. तर इन्कम फंडातून ६,५१८ कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या, एसआयपी फंड पर्यायात १.५० लाख गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरअखेर गुंतविलेली रक्कम ७,९८५ कोटी रुपये आहे.

आगामी वर्षांसाठी लक्ष्य ३० लाख कोटींचे!

म्युच्युअल फंड मालमत्ता वार्षिक २० टक्के दराने गेल्या काही वर्षांत वाढली आहे, हे पाहता ती डिसेंबर २०१९ अखेर ३० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, असा विश्वास ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी एन. एस. व्यंकटेश यांनी व्यक्त केला.