मुंबई : रिलायन्समधील गुंतवणूक व उद्योग समूहातील स्थान याबाबतचा सौदी आराम्कोबाबतचा तिढा वर्षअखेर संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी केली.

रिलायन्स समूहाच्या भागविक्रीपश्चात आयोजित ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी, सौदी आराम्को १५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असून या कंपनीचे अध्यक्ष तसेच आखातातील विदेशी गुंतवणूक निधीचे प्रमुख यासीर ओथमन अल रुमायान यांची रिलायन्सच्या संचालक मंडळावर वर्णी लागेल, असे जाहीर केले.

समूहातील तेल व रसायन कंपनीतील २० टक्के हिस्सा विकण्यात येणार असून ही सर्व प्रक्रिया डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. रिलायन्सच्या संचालक मंडळावरील ९२ वर्षीय योगेंद्र त्रिवेदी यांच्या निवृत्तीनंतर रुमायान यांना संचालक मंडळात स्थान मिळेल.

उच्चविद्याविभूषित रुमायान यांच्या सौदी आराम्कोने वर्षभरापूर्वी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समधील २.३२ टक्के हिस्सा ११,३६७ कोटी रुपये मोजून खरेदी केला होता. पाच महिन्यांनतर आणखी २.०४ टक्के हिस्सा खरेदी करण्यासह विदेशी कंपनीने रिलायन्सच्या फायबर ऑप्टिक व्यवसायात ३,७७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

नव‘जिओ’ला गणेश चतुर्थीचा मुहूर्त!

वर्ष २०१६ मध्ये गणेश चतुर्थीला जिओमार्फत दूरसंचार क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रिलायन्स जिओने यंदा पुन्हा अद्ययावत व जलद तंत्रज्ञान सादरीकरणासाठी हाच मुहूर्त निवडला आहे. गुगलच्या तंत्र पाठबळावर येत्या १० सप्टेंबरला ५जी तंत्रज्ञानावर आधारित परवडणाऱ्या किमतीतील ‘जिओफोन नेक्स्ट’ सादर करण्याची घोषणा रिलायन्सने गुरुवारी केली. ‘ओएस’ मंचावरील नव्या स्मार्टफोनची किंमत तसेच अन्य वैशिष्ट्ये स्पष्ट न करताच भारतातील दूरसंचार क्षेत्रात भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) या फोनमार्फत आणखी एक इतिहास रचला जाईल, असा विश्वास प्रवर्तक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. गुगलने रिलायन्समध्ये गेल्या वर्षी ७.७ टक्के हिस्सेदारीसह ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती.