14 October 2019

News Flash

बाजार अस्थिरतेला, स्मार्ट गुंतवणुकीचा उतारा

निमिष शहा देशांतर्गत मागणी, अल्प व्याजदर, कच्च्या तेलातील स्वस्ताई यामुळे भारत गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनले आहे. यामुळे अर्थव्यवस्था झपाटय़ाने सुधारली आहे. नजीकच्या काळात कॉर्पोरेट कंपन्यांची

निमिष शहा

देशांतर्गत मागणी, अल्प व्याजदर, कच्च्या तेलातील स्वस्ताई यामुळे भारत गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनले आहे. यामुळे अर्थव्यवस्था झपाटय़ाने सुधारली आहे. नजीकच्या काळात कॉर्पोरेट कंपन्यांची आर्थिक आघाडीवरील कामगिरी उंचावले अशी चिन्हे आहेत. परिणामी बँकांकडून कर्जाची मागणी वाढेल आणि उद्योग क्षेत्राकडून गुंतवणुकीचे चक्रही सुरू होईल. सरकारने अनेक सुधारणा केल्या असून गुंतवणूक वाढीला प्राधान्य दिले आहे. या पाश्र्वभूमीवर २०१९ साल हे गुंतवणुकीसाठी आशादायीराहावे.

वर्ष २०१८ ची सकारात्मक सुरुवात झाली होती. २०१७ सालाने शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळविता आला होता. २०१७ सालात ‘निफ्टी ५०’ निर्देशांक २८ टक्क्यांनी वधारला तर याच कालावधीत निफ्टी ‘मिडकॅप १००’ निर्देशांकाने ४७ टक्के आणि निफ्टी ‘स्मॉल कॅप २५०’ने ५७ टक्के परतावा दिला. अर्थातच मिडकॅप समभागांतील गुंतवणुकीने निफ्टीच्या तुलनेत अधिक परतावा दिला. परंतु त्याच वेळी  स्मॉलकॅप आणि मिडकॅपचे वाजवीपेक्षा जास्त मूल्यांकन झाले होते. त्या उलट परिस्थिती २०१८ सालात होती. २०१८ मध्ये ‘निफ्टी ५०’ने जेमतेम तीन टक्के परतावा दिला. वर्षभरात मिडकॅप निर्देशांकात १५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात २७ टक्क्यांची घसरण नोंदली गेली. २०१८ सालाची शिकवण हीच की, मूल्यांकन लक्षात न घेता गुंतवणूक केल्यास बाजारात पडझड झाल्यास पैसे गमावण्याची शक्यता जास्त आहे.

गत वर्षांशी तुलना केल्यास २०१९ सालचे सुरुवातीचे मूल्यांकन तुलनेने अधिक सुरक्षित आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरण, चलनवाढीचा नीचांक, रोखे परताव्यांतील घसरणीचा क्रम, हे घटक आर्थिक परिस्थितीत बरीच सुधारणा सुरू असल्याचे संकेत आहेत. चालू आर्थिक वर्षांत (२०१९-२०) उद्योग क्षेत्राच्या उत्पन्नात वृद्धी होण्याचे संकेत आहेत. ज्यातून बँकांवरील बुडीत कर्जाचा भार हलका होण्याचे महत्त्वाचा परिणाम दिसून येईल.

बाजारातील जवळपास ८० टक्के शेअर्सचे मूल्य योग्य असून काही मोजक्याच शेअर्सचे मूल्य वाजवीपेक्षा जास्त आहे. २०१८ मध्ये केवळ मिडकॅप आणि लार्जकॅप शेअर्सच नाही तर काही महत्त्वाच्या क्षेत्रीय निर्देशांकात मोठे बदल दिसून आले. ज्यात आयटी, एफएमसीजी या क्षेत्रांनी दुहेरी आकडय़ांमध्ये परतावा दिला. तर याच कालावधीत एकीकडे खासगी बँकांची कामगिरी बहरत असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँका बुडित कर्जाच्या दबावाखाली राहिल्या. बिगर बँकिंग वित्त संस्थांच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात उलथापालथ झाली.

मागील घडामोडींचा आढावा घेता २०१९ हे वर्ष चांगले शेअर खरेदीचे संधीचे वर्ष ठरू शकेल. मात्र सार्वत्रिक निवडणुका, व्यापार युद्ध आणि कच्च्या तेलाच्या किमती आदी घटक लक्षात घेता हे वर्ष प्रचंड अस्थिरतेचे ठरेल. त्यामुळे नियोजनबद्ध गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारणे हिताचे राहील.

(लेखक आयसीआयसीआय प्रुडेंशिअल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी )

First Published on March 14, 2019 5:17 am

Web Title: investment in share market instability in indian stock market