शेअर बाजार तेजीत असला तरी, तुलनेने कमी जोखीम घेऊन चांगला परतावा देणाऱ्या डेट् व मनी मार्केट फंडामध्ये गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील काही रक्कम गुंतविण्याचा विचार करता येईल.
रिझव्‍‌र्ह बँकेने ३ जून २०१४ रोजी जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारीत महागाई दरामध्ये जानेवारी २०१५ मध्ये ८% पर्यंत आणि जानेवारी २०१६ पर्यंत ६% पर्यंत घटीच्या लक्ष्याबाबत बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. महागाई दरासंबंधीची जोखीम संतुलित असल्याचेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. अपेक्षेपेक्षा कमी मान्सून आणि इंधरदरवाढीचे संकट यांचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी, सरकारकडून अन्नपुरवठय़ात सुधार व वित्तीय शिस्तीला प्राधान्य देताना कठोर पावले उचलली जाण्याची शक्यताही रिझव्‍‌र्ह बँकेने वर्तवली आहे.
एकंदरीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातील नरमाई आणि ते काहीसे शिथिलतेकडे झुकल्याचा उत्साह डेट् मार्केटमध्ये दिसून आला. त्या परिणामी १० वष्रे मुदतीच्या बेंचमार्क जी-सेक रोख्यांचे उत्पन्न ८.७०% वरून ८.५०% पर्यंत खाली आले असून त्यामुळे रोख्यांच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. इथून पुढे कोणत्याही दिशेला मोठी हालचाल करण्यापूर्वी मार्केट वित्तीय तूट आणि नवीन महागाई दराची (सीपीआय) आकडेवारी यांची प्रतीक्षा करेल. सरकारला आगामी वर्षांसाठी वित्तीय तूट गेल्या वर्षीइतकी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.५% या पातळीपर्यंत राखता आली तर रोख्यांच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकेल. बेस इफेक्ट आणि गेल्या एक महिन्यातील अन्नधान्याच्या किमतीतील घट यामुळे येत्या काही महिन्यांत महागाई दरात घट होण्याची शक्यता आहे. परंतु, मान्सून हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याचा धोका वाढेल.
देशामध्ये डॉलरचा ओघ येत असल्याने गेल्या एक-दोन महिन्यांत रोखताही समाधानकारक आहे आणि रिझव्‍‌र्ह बँकेने परकीय चलन बाजारात हस्तक्षेप केल्याने व्यवस्थेतील रुपयाची उपलब्धता वाढली आहे. यामुळे मनी मार्केट रेट (१ वष्रे मुदतपूर्तीपर्यंतचे) कमी झाले आहेत. ओव्हरनाइट रेट हे ८% रेपो रेटच्या पातळीवर असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने ओव्हरनाइट रोखतेचे सक्रिय व्यवस्थापन करावे, अशी अपेक्षा आहे. एकंदर, मनी मार्केट रेट कमी राहतील अशी अपेक्षा आहे आणि येत्या काही महिन्यांत रोखता सुलभ राहणार असल्याने कमी प्रमाणात वर-खाली होतील, असे वाटते.
गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील काही रक्कम डेट् व मनी मार्केट फंडामध्ये गुंतविण्याचा विचार करावा. त्यांनी सध्या सुलभ रोखतेचा फायदा मिळण्यासाठी व तीन ते १२ महिने या गुंतवणूक काळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंड व अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड यांचा विचार करावा. महागाई आटोक्यात आणण्याचे नव्या सरकारचे प्रयत्न सुरू झाले की दीर्घ रोख्यांच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा असल्याने त्यांनी १२ ते २४ महिने इतक्या कालावधीत इन्कम फंडामध्ये गुंतवणूक करण्याचाही विचार करावा.  
लेखक यूटीआय म्युच्युअल फंडाचे   स्थिर उत्पन्न फंडाचे निधी व्यवस्थापक