४० उद्योगांचे गुंतवणूक स्वारस्य

गुंतवणूकदारांना आकर्षिण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत गुरुवारी भरविण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या गूंतवणूक परिषदेत ३२,९६३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करारमदार झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांतील ४० उद्योगांबरोबर करण्यात आलेल्या या करारांमुळे त्या राज्यात दीड लाखांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

उत्तर प्रदेश राज्य शासनाच्या वतीने गुरुवारी एकदिवसीय गुंतवणूक परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमाही उपस्थित होते. तर उद्योग क्षेत्रातून रिलायन्स इंडस्ट्रिज, आदित्य बिर्ला समूह, रिलायन्स-अनिल धीरुभाई अंबानी समूह, आर. पी. गोयंका समूह, टाटा, अदानी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जपानच्या तोशिबा पॉवरने ६६० मेगाव्ॉट औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी या वेळी ३,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला. तर एलजी, रिलायन्स जिओ, आयडिया सेल्युलर, गोदरेज अ‍ॅग्रोवेट, आयटीसी यांनीही करार केले. क्षेत्राच्या बाबत पायाभूत सेवा क्षेत्राने सर्वाधिक, १३,४०५ कोटी रुपयांचे करार या वेळी केले.
तामिळनाडूतही बुधवारी भरविण्यात आलेल्या अशाच उद्योग आमंत्रण परिषदेत एक लाख कोटी रुपयांचे जवळपास १०० करार झाले. अशीच एक उद्योग परिषद पंजाब आणि हरियाणातही लवकरच भरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, विदर्भ अशी विभागनिहाय गुंतवणूक-उद्योग परिषद काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आली.

बॉलीवूडला आवतण
चित्रपट निर्मितीसाठी राज्याने केलेल्या सवलत तसेच अन्य उपाययोजनांचा आढावा या वेळी घेण्यात आला. ‘टिपू सुलतान’फेम संजय खान, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता संजय कपूर, दिग्दर्शक केतन मेहता, खलनायक सुधीर मिश्रा, ‘भजनसम्राट’ अनुप जलोटा आदी या वेळी उपस्थित होते. राज्यात चित्रीकरण करणाऱ्या चित्रपटांना आर्थिक साहाय्यतेचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

मराठी, महाराष्ट्राबद्दल टीकात्मक टिप्पणी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या वेळी मराठीसह एकूण महाराष्ट्रावर कुणाचेही नाव न घेता टीका केली. ‘गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे ज्या राज्याचे नाव वाईटरीत्या घेतले जाते तेथे कुणी कशाला गुंतवणूक करेल,’ असा सवाल त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नागपुरातील वाढत्या गुन्ह्य़ांचा याला संदर्भ होता. तर माध्यमांमध्ये (मराठी) आपल्या राज्याबद्दल खूपच नकारात्मकता पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. चुकीच्या बातम्यांद्वारे निर्माण केले जात असलेल्या चित्राऐवजी प्रत्यक्ष राज्यात येऊन अनुभव घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित उद्योजकांना केले. महाराष्ट्रातील वाढत्या लोंढय़ाबाबत बोलताना, ‘मग आमचे राज्यपाल (राम नाईक) कुठले आहेत,’ असा सवालही त्यांनी खोचकपणे केला.