19 January 2019

News Flash

लक्ष्याचा पाठलाग करा, परतावा आपोआपच माग घेईल!

आर्थिक कल्याणाची  दिशा भरकटेल, अशा सापळे आणि प्रलोभनांना यातून आपोआप टाळले जाते.

पैसा आला तर तुम्ही काय काय कराल? तुमच्या स्वप्नांतील घर घ्याल, कुटुंबाला विदेशात सहलीला न्याल, कदाचित नजरेत भरलेली आलिशान मोटार घ्याल अथवा मुलांना परदेशातील सर्वोत्तम संस्थेत शिकायला पाठवाल.. यापैकी आणि अशा कोणत्याही महत्त्वाकांक्षा मनांत असतील, तरच त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तुम्ही धडपड कराल. कोणतेही यश संपादण्यासाठी सर्वप्रथम ध्येयाची निश्चिती ही त्याची पहिली व महत्त्वाची पायरी असते. मग ही ध्येय वैयक्तिक असोत, व्यावसायिक असोत वा आर्थिक!

‘जर आनंदी जीवन जगू इच्छित असाल तर, त्याची खूणगाठ कोणा व्यक्ती किंवा गोष्टींशी नव्हे, तर साजेशा लक्ष्याशी बांधली जायला हवी,’ असे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले आहेत. आर्थिक समृद्धीच्या दिशादर्शनातही तुमचे सर्व आर्थिक व्यवहार हे सुस्पष्ट आर्थिक उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दिशेने घडायला हवेत. लक्ष्य निश्चित करणे हे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या प्रत्येक कृतीला हेतू आणि दिशा प्राप्त होते. आपल्यापाशी असलेल्या संसाधनांचा प्रभावीपणे वापर करणे यामुळे शक्य होते. आर्थिक कल्याणाची  दिशा भरकटेल, अशा सापळे आणि प्रलोभनांना यातून आपोआप टाळले जाते.

आर्थिक नियोजनाच्या मार्गावर योग्य पाऊल स्थापित करण्यासाठी, उद्दिष्टांच्या निश्चितीची पूर्वअट पूर्ण करताना आपण खालील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे :

उद्दिष्टांची विभागणी करा : तुम्ही निश्चित केलेल्या आर्थिक उद्दिष्टांची अल्प मुदतीची (सहल, मुलांचे पुढील शिक्षण), मध्यम मुदतीची (लग्न, घर) आणि दीर्घ मुदत (निवृत्तिपश्चात जीवनमान) अशी कालानुरूप विभागणी करा. हे असे केल्यामुळे तुम्ही उद्दिष्टपूर्तीसाठी निश्चित केलेल्या कालावधीला साजेसा गुंतवणूक पर्याय निवडणे सोपे बनते. अल्पमुदतीच्या उद्दिष्टाला साकारण्यासाठी लिक्विड/डेट फंडाचे पर्याय आणि मुदत ठेवींचा वापर करता येईल. समभाग गुंतवणुकीने ऐतिहासिकदृष्टय़ा १५ ते २० वर्षांच्या कालावधीत १५-१६ टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे आणि हा मध्यम तसेच दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट साकारण्यासाठी सुयोग्य पर्याय आहे. समभाग अथवा समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’सारख्या नियोजनबद्ध पद्धतीचा वापर केल्यास, चक्रवाढ गतीने लाभाची किमया तुम्हाला अपेक्षित परताव्यासाठी साधता येईल.

उद्दिष्टे मापनयोग्य असावीत : तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किती रकमेची गरज आहे हे मापता यायला हवे. ऑनलाइन मोफत उपलब्ध असलेल्या गणकाच्या साहाय्याने ठरावीक वेळेत विशिष्ट रक्कम उभी करण्यासाठी दरमहा किती रकमेची बचत हवी हे ठरविता येईल. उद्दिष्टे ठरविली गेल्यास तुमच्या आर्थिक सवयींना आपोआपच चांगले वळण लागेल. सुदृढ पैशाचे व्यवस्थापन हे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांसमीप घेऊन जाईल. मध्यावधी आढाव्याच्या वेळी तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने मागे पडल्याचे दिसून आल्यास, हा पूर्वइशारा समजला जावा आणि बचत आणि गुंतवणुकीसंबंधी तुमच्या दृष्टिकोनात आवश्यक बदल करावा.

लक्ष्यावरून दृष्टी वळता कामा नये : झटपट लाभाचा मोह जडणे हे वित्तीय आघाडीवर ठरविलेले नियोजन बिघडण्याचे प्रमुख कारण असल्याचे दिसले आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंगचा गंध नसलेलेही बाजार उसळलेला असताना त्यात उडी मारण्याचा यत्न करतात. नजीकच्या मित्र-नातेवाईकाने रातोरात लाभ कमावला, आपणही नशीब आजमावू, हे प्रलोभन अनेकदा नडते आणि प्रसंगी न सुधारता येणाऱ्या घोडचुका घडतात. गुंतवणुकीवर भरभक्कम ४०-५० टक्कय़ांचा लाभ अथवा वर्ष-सहा महिन्यांत दुप्पट परतावा देणाऱ्या भुक्कड योजनांच्या आमिषांना भुलणारेही आहेत. शास्त्रीय गुंतवणुकीचा धर्म एकदा स्वीकारल्यास ‘गुंतवणूकदारां’नी अशा दिशाभूल करणाऱ्या आमिषांना भीक घालता कामा नये. तुमची दृष्टी ही कायम तुमच्या लक्ष्यावर हवी आणि त्यासाठी निश्चित केलेल्या नियोजनाशी तुमची प्रामाणिकता हवी. त्या लक्ष्यांपर्यंत पोहोचणारा कोणत्याही शॉर्ट कटचा मोह टाळलेलाच बरा.

दिरंगाई नको : उद्दिष्ट नसतील, तर आर्थिक नियोजनही नसेल. जितक्या लवकर तुम्ही तुमची उद्दिष्टे नक्की कराल, तितक्या लवकर गुंतवणूक सुरू होऊन मोठय़ा अवधीत चक्रवाढ परताव्याचा लाभ मिळविणे शक्य होईल. उद्दिष्टनिश्चितीत दिरंगाई ही परताव्यातील चक्रवाढ लाभाला मुकण्यासारखी ठरेल.

हेन्री फोर्ड यांचे एक समर्पक वाक्य आहे- ‘‘लक्ष्यावरील दृष्टी ढळली की, आपल्या ध्येय-मार्गावरील अडथळ्यांसारख्या भयावह गोष्टी आपल्याला दिसू लागतात.’’ म्हणूनच सर्व वळणवाटा टाळत आणि वित्तीय स्वप्नांना साकारण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने काम करायचे झाल्यास, केवळ लक्ष्यावर तीक्ष्ण नजर हवी.

(लेखक अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी)

First Published on April 11, 2018 2:00 am

Web Title: investment indian market