अतिशय बुद्धिमान,दयाळू देवता असणारा गणपती भक्तांच्या हाकेला सदा धावून जाणारा आहे. संपत्तीची आणि भरभराटीचीही देवता असणाऱ्या गणेशाशी संबंधित प्रतीकांचा आपण जीवनातल्या विविध पैलूंसाठी अवलंब करू शकतो. आपल्या लाडक्या देवाची मूर्ती समजून घेऊन, त्यातून गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे धडे घ्यायला हवेत.

* मोठे मस्तक : हत्तीसारखे प्रचंड मोठे मस्तक मनाच्या मोठेपणाचे आणि बुद्धीचे प्रतीक आहे. गणेश ही विद्या व सूज्ञतेची देवता असल्याने, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी ज्ञान आणि शिक्षणाचा वापर करावा. संशोधन करा, विश्लेषण करा, चर्चा करा आणि त्यानंतरच गुंतवणूक करा, अशी शिकवण गणपती देतो.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

* मोठे कान : गणपतीचे कान जितके मोठे आहेत याचे कारण गणपती बारकाईने ऐकतो आणि जे योग्य व चांगले आहे ते आत्मसात करतो. नव्या कल्पना व माहिती कधीही चुकवू नका. तुमचा आर्थिक सल्लागार काय सांगतो आहे ते ऐका.

* विशाल उदर : गणपती काहीही पचवू शकतो; चांगल्या गोष्टीही आणि वाईट गोष्टीही. आयुष्यामध्ये येणारे सगळे चढ-उतार पचवण्याची आणि आपल्या वाटचालीचा वेग कायम ठेवण्याची शिकवण आपल्याला यातून मिळते. बाजारातील तेजी-मंदीमध्ये तग धरण्यासाठी आणि चुकीचे निर्णय पचवण्यासाठी पुरेशी क्षमता विकसित करा. तुमचे उद्दिष्ट कायम लक्षात ठेवा. जोखीम घेताना सावधगिरी बाळगा.

* लहान डोळे : गणपतीचे शरीर मोठे असले तरी त्याचे डोळे लहान व तीक्ष्ण आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करता, बाजारात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली; निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गोंधळ उडाला, तसेच तुम्ही बजेटच्या बाहेर खर्च करू लागलात तर तो मोह टाळा आणि पुन्हा लक्ष एकाग्र करा, तुमचे नियोजन लक्षात घ्या, अशी शिकवण आपल्याला मिळते.

* लहान तोंड : मूर्तीमध्ये व चित्रामध्ये गणेशाचे मुख क्वचित दिसते. गणपती फार बोलत नाही. एक गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही तुमचे निर्णय व उद्दिष्टांविषयी अनावश्यक चर्चा करणे टाळायला हवे.

* लवचीक सोंड : वक्रतुंड म्हणजे वक्राकार सोंड असणारा गणपती. सोंड अतिशय सक्षम असली तरी ती लवचीकता व बदल स्वीकारण्याची क्षमता दर्शवते. काही वेळा कोर्स-करेक्शन गरजेचे असते. तुमच्या ‘पोर्टफोलिओ’चा नेहमी आढावा घ्या आणि चांगल्या संधींचा शोध घेत राहा. संपत्तीतील विविधता, मुदत काळात फेरबदल आणि गुंतवणुकीची रक्कम या बाबतीत थोडी लवचीकता आणणे आवश्यक असते.

* एकदंत : गणपतीला एकदंत असे म्हटले जात असले तरी त्याला दोन दंत असतात; त्यातील एक दात तुटलेला असतो. तुटलेला दात कोणत्याही संकटातून सावरण्याची क्षमता दाखवून देतो आणि दुसरा दात वाईटावर मात करण्याचे सामर्थ्य दाखवतो. तुमच्याकडेही पोर्टफोलिओतून चुकीच्या गुंतवणूक काढून टाकण्याची हिंमत हवी.

* चार हात : गणपतीचा प्रत्येक हात गुंतवणुकीच्या निरनिराळ्या पैलूंचे प्रतीक आहे. गणपतीच्या एका हातात कुऱ्हाड असते; बाजारातील चढ-उतारांमुळे ज्या चिंता निर्माण होतात व लक्ष विचलित होते, त्यावर घाव घाला, असे यातून सूचित होते. गणपतीच्या दुसऱ्या हातात मोदक असतो. याचा अर्थ म्हणजे, आपली उद्दिष्टे आपण कधीही विसरता कामा नये. तिसऱ्या हातामध्ये दोरी असते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला वर आणणे. आपली गुंतवणूकही आपल्याला जीवनात वर-वर घेऊन जाणारी असायला हवी. गणपतीचा चौथा हात सतत आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असतो. यातून, केवळ जास्तीत जास्त नफा मिळवण्यापेक्षा उद्दिष्ट महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.

* छोटा उंदीर : उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. तो कायम गणेशाच्या पायाशी असतो. जर लक्ष ठेवले नाही तर छोटासा उंदीर अख्खे घर खाली पाडू शकतो, हे प्रत्यक्षातही घडते. आपल्या इच्छा व मोह नियंत्रणात ठेवा, असे गणपती यातून आपल्याला शिकवतो. गुंतवणूक यशस्वी होण्यासाठी एक मूलभूत बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, शिस्तबद्धता. प्रत्येक गोष्ट त्यावर अवलंबून असते. तुमच्या बजेटच्या बाहेर कधीही जाऊ नका. साधी राहणी स्वीकारा.

* मंगलमूर्ती : गणेश ही आद्यदेवता आहे. कोणत्याही देवाच्या आधी गणेशाची पूजा केली जाते. पुरेशी गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. त्याला नेहमीच पहिले प्राधान्य द्यायला हवे. खर्च करण्यापूर्वी बचत करा आणि जीवनातील टप्प्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूक करा. सुरुवात योग्य झाली तर शेवटही चांगला होतो.

* विघ्नहरण : गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते, म्हणजे तो आपल्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो. चांगली गुंतवणूकही नेमके हेच करते; ती आपल्याला मार्गातील चिंता, अडथळे आणि आव्हाने दूर करण्यासाठी मदत करते आणि सुखी जीवन जगण्यासाठी पाठबळ देते.

* साथीदार : गणपतीच्या दोन पत्नी आहेत : रिद्धी (भरभराट) व सिद्धी (पूर्तता). अचूक नियोजनाने  गुंतवणूक केल्यास आयुष्यभर भरभराट साध्य करता येऊ शकते.

– तुषार बोपचे, मालमत्ता व्यवसाय विभागाचे प्रमुख, येस सिक्युरिटीज