पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ‘राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (एनआयआयएफ)’कडून प्रवर्तित कर्ज उभारणी व्यासपीठात दोन वर्षांत सहा हजार कोटींची भागभांडवली गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली.

सरकारच्या या गुंतवणुकीतून या एनआयआयएफ या व्यासपीठाला २०२५ सालापर्यंत एक लाख कोटी रुपयांची कर्ज उभारणीचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.

या कर्ज निधीचा विनियोग पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या विकसनासाठी होणे अपेक्षित आहे, अशी माहिती माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चालू महिन्यांत जाहीर झालेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यातील घोषणांचा भाग म्हणून हा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.