चालू आर्थिक वर्षांत भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या निवडक अशा चार कंपन्यांच्या समभागांना चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांनी जारी केलेल्या किमतीच्या तुलनेत समभागाचे मूल्य उंचावल्याने गुंतवणूकदारही सुखावले आहेत.
मनोरंजन उद्यान क्षेत्रातील वंडरला हॉलिडेजने बाजारात सूचिबद्ध चालू आर्थिक वर्षांची सुरुवात केली होती. कंपनीने एप्रिलमध्ये जारी केलेल्या १२५ रुपयांच्या तुलनेत समभागाचे मूल्य आता दुप्पट झाले आहे. बुधवारी कंपनी समभाग २८६.९५ रुपयांवर पोहोचला. पहिल्या महिन्यात कंपनी समभाग मूल्य ३८ टक्क्यांनी, तर मेमध्ये २८ टक्क्यांनी वाढले होते.
वातानुकूलित मालवाहतूक सेवा देणाऱ्या स्नोमॅन लॉजिस्टिक्सचे समभाग मूल्य ८४.१४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या महिन्यात बाजारात प्रवेश करतेसमयी कंपनी समभागाचे मूल्य ४७ रुपये होते. ते बुधवार व्यवहारअखेर ८६.५५ रुपयांवर गेले.
कृषी रसायन क्षेत्रातील शारदा क्रॉपकेम कंपनीचा समभागही आता ३३.७८ टक्क्यांनी वधारला आहे. २३ सप्टेंबरला पदार्पणात, १५६ रुपयांनी सुरुवात करणाऱ्या या समभागाचे मूल्य बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा २८६.५५ रुपयांवर गेले होते. कंपनीचा समभाग नोंदणी होताच ४८ टक्क्यांनी उंचावला होता.
शेमारु एन्टरटेनमेन्ट या चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील कंपनीचा समभाग बुधवारी पहिल्याच दिवशी सूचिबद्ध होताना ०.५९ टक्क्याने वधारला. कंपनीने १७० रुपये प्रति समभाग मूल्य जाहीर केले असताना बुधवारअखेर समभाग १७१ रुपयांवर स्थिरावला.
भांडवली बाजाराचा सध्याचा तेजीचा प्रवास व गुंतवणूकदारांमध्ये नव्याने निर्माण झालेला उत्साह या जोरावर चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत बाजारात धडकणाऱ्या आगामी कंपन्यांनाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चालू वर्षांत आतापर्यंत लवासा कॉर्पोरेशन, अ‍ॅडलॅब्ज एन्टरटेनमेन्ट, जीएमआर एनर्जी, राष्ट्रीय इस्पात, व्हिडीओकॉन डीटूएच अशा काही कंपन्यांनी बाजारात धडक दिली. एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत सेन्सेक्स ४ हजारांहून अधिक अंशांनी वधारला आहे.युनायटेड स्पिरिट्स, एमसीएक्सचे समभाग ‘अ’ वायदा गटांतून बाहेर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बातम्यांच्या चर्चेत असलेले समभाग ‘ग्रुप बी’मध्ये वर्ग करण्यात आले आहेत. ‘ग्रुप ए’मधील युनायटेड स्पिरिट्स, एमसीएक्स, फायनान्शियल टेक्नॉलॉजिज् या समभागांचे व्यवहार येत्या आठवडय़ात नव्या श्रेणीत होतील. प्रवर्तकांच्या वाढीव हिस्सा वादावरून फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज, एमसीएक्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. याचबरोबर ‘ग्रुप बी’मधील जस्ट डायल, टीव्हीएस मोटर्स, एसकेएस मायक्रो फायनान्स, इंडिया सिमेन्ट्ससह १०५ कंपन्या ‘ग्रुप ए’मध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत. येत्या ७ ऑक्टोबरपासून नव्या वर्गवारीनुसार उभय कंपन्यांचे व्यवहार आता मुंंबई शेअर बाजारात होतील. ‘ग्रुप ए’मध्ये ३०० तर ‘ग्रुप बी’मध्ये ३ हजार कंपन्यांचे व्यवहार होतात.