अशिलांची देणी चुकती करण्यात काही शेअर दलालांकडून दिसणारी अनियमितता पाहता, भांडवली बाजारांचा गुंतवणूकदार संरक्षण निधी (आयपीएफ) अत्यंत तुटपुंजा असल्याचे नमूद करून, हा निधी वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना भांडवली बाजारांना एकत्र घेऊन राबविल्या जातील, असे ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी येथे बोलताना प्रतिपादन केले.

भारतीय उद्योग महासंघ – सीआयआयने आयोजित केलेल्या ‘भारतीय वित्तीय बाजारातील सुधारणा’ या विषयावरील आभासी परिषदेत त्यागी बोलत होते. लवकरच गुंतवणूकदार संरक्षण निधी वाढविण्यासाठी भांडवली बाजारांशी सल्लामसलत करून योग्य त्या सूचना लवकरच दिल्या जातील. त्यागी म्हणाले, ‘शेअर दलालांच्या अनियमिततेला खपवून घेतले जाणार नाही. नसून अलीकडील अशा प्रकारांचा विस्तृतपणे पुनरावलोकन केल्यानंतर लवकरच दोषी दलालांवर कारवाई करणार आहोत.’

दलालांनी हात वर केल्यानंतर, नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांच्या भरपाईसाठी गुंतवणूकदार संरक्षण निधीची (आयपीएफ) तरतूद केली गेली आहे. ही भरपाई प्रति गुंतवणूकदार २५ लाखांपर्यंत केली जाऊ शकते. तथापि उपलब्ध माहितीनुसार, मुंबई शेअर बाजाराकडे जवळपास ७५० कोटी रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजाराकडे हा निधी ५०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. त्यात वाढविण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी ‘सेबी’ने अलीकडेच एका उपसमितीचे गठनही केले आहे.

मुसंडी व्यापक

भांडवली बाजारात तेजीचा चौखूर उधळलेला बैल आणि अर्थव्यवस्थेचे वास्तविक रूप हे विसंगत आहे आणि त्यावरून नकारार्थी सूरही व्यक्त केला जात असल्याचे मान्य करीत ‘सेबी’ अध्यक्ष त्यागी यांनी बाजारातील ताज्या उधाणावर शंकेला जागा नसल्याचे सूचित केले. करोना साथीच्या धक्क्याने कोसळलेल्या बाजाराने मार्चपासून पुढे घेतलेली फेरउसळी ही ‘व्यापक’ (सर्वव्यापी) असल्याची त्यांनी पुस्ती जोडली.