मुंबई : भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षांच्या कालावधीत सेन्सेक्स ४१ टक्क्यांनी झेपावला आहे, तर मोदी सरकारच्या कालावधीत गुंतवणूकदारांची मालमत्ता ७२ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

मोदी सरकार सत्तेत येऊन शनिवारी चार वर्षे पूर्ण होत आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०,२०७.९९ अंशांनी झेपावला आहे. टक्केवारीत ही वाढ ४१.२९ आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य गेल्या चार वर्षांत ७५ लाख कोटी रुपयांवरून १४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मुंबई निर्देशांकाने २९ जानेवारी २०१८ रोजी ३६,४४३.९८ हा ऐतिहासिक टप्पा गाठला होता.दरम्यान, सेन्सेक्सने सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांक वाढ नोंदविताना ३५ हजारानजीकचा स्तर राखला, तर निफ्टीही १०,६०० पुढे गेला. सप्ताहअखेरच्या व्यवहारातील निर्देशांक तेजीमुळे टाटा समूहातील टीसीएस ही कंपनी सर्वाधिक, ७ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल कमाविणारी कंपनी ठरली.

आणखी दोन सरकारी बँकांना तोटा

मुंबई : देशातील आणखी दोन सरकारी बँकांना मार्च २०१८ अखेरच्या तिमाहीत वाढत्या तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी स्टेट बँक व पंजाब नॅशनल बँक या दोन आघाडीच्या सार्वजनिक बँकांनी तोटय़ाचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले आहे.शुक्रवारी आर्थिक ताळेबंद जाहीर झालेल्या दोन बँकांपैकी आयडीबीआय बँकेचा तोटा वर्षभरापूर्वीच्या ३,१९९.७७ कोटी रुपयांवरून ५,६६२.७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर बँक ऑफ बडोदाने वर्षभरापूर्वीच्या १५४.७२ कोटी रुपयांच्या नफ्यातून यंदा ३,१०२.३४ कोटी रुपयांच्या तोटय़ाचा प्रवास नोंदविला आहे.