गुंतवणूकदारांना पुन्हा डेट फंडांचे आकर्षण

मुंबई : भांडवली बाजारात निर्देशांक विक्रमी शिखर गाठत असताना, मावळत असलेल्या २०२० सालात रोखेसंलग्न अर्थात डेट म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना १०.५ टक्कय़ांहून अधिकचा परतावा दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदार पुन्हा एकदा डेट फंडांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

गेल्या तीन वर्षांचा काळ क्रेडिट रिस्क फंडाचा अपवाद केल्यास, डेट फंडांसाठी समाधानकारक राहिला आहे. कॉर्पोरेट बॉण्ड फंड्स, गिल्ट फंड्स आणि मध्यम ते दीर्घ मुदतीच्या फंडांनी १० टक्क्य़ांपर्यंत परतावा दिला आहे. ‘अर्थलाभ डॉटकॉम’द्वारे उपलब्ध आकडेवारीनुसार, डेट म्युच्युअल फंड श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या योजनांनी चांगली कामगिरी केली आहे.

या फंड घराण्याच्या गिल्ट फंडाने एका वर्षांत १३.०७ टक्के, दोन वर्षांत १२.२७ टक्के आणि पाच वर्षांत ९.८१ टक्के लाभ मिळवून दिला आहे. याच कालावधीत त्याच्या ‘ऑल सीझन बॉण्ड फंडा’ने अनुक्रमे १२.११ टक्के, ११.४६ टक्के आणि ९.८६ टक्के तर ‘लाँग टर्म बॉण्ड फंडा’ने ११.३३ टक्के, १२.५० टक्के आणि ९.८१ टक्के परतावा दिला आहे.

तुलनात्मक वेध घेता, आयसीआयसीआय प्रु.च्या कॉर्पोरेट आणि शॉर्ट टर्म बॉण्ड फंडांच्या श्रेणीने एका वर्षांत गुंतवणूकदारांना १० टक्कय़ांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर याच अवधीत कोटक म्युच्यअल फंडाच्या याच श्रेणीतील फंडांनी सरासरी ९.८ टक्के, तर आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडांचा परतावा सरासरी ९.६५ टक्के आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत तो सरासरी ९.५४ टक्के असा आहे.

निश्चित उत्पन्न (फिक्स्ड इन्कम) मालमत्ता व्यवस्थापित करणाऱ्या सर्वात मोठय़ा फंड घराण्यांमध्ये अग्रणी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची निश्चित उत्पन्न श्रेणीतील एकूण मालमत्ता (एयूएम) २.२ लाख कोटी रुपये आहे. या फंड घराण्याचा पत संशोधन संघ हा निधी व्यवस्थापन उद्योगात अनुभवी असून गेल्या २० वर्षांत या फंडांनी देणी थकविल्याचे अथवा व्याज देण्यास उशीर केल्याचा प्रसंग दिसून आलेला नाही. या फंड घराण्याचे स्थिर उत्पन्न मालमत्तांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राहुल गोस्वामी यांच्या मते सुरक्षा, तरलता आणि परतावा (एसएलआर) पॉलिसीवर लक्ष केंद्रित असल्याने त्यांच्या डेट फंडांनी चांगला परतावा दिला आहे.