केंद्र सरकारच्या थेट लाभाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या भांडवली बाजारांनी गुरुवारी अपेक्षित तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यातच जागतिक निर्देशांकांची घसरण साथ मिळाल्याने सेन्सक्स व निफ्टी अडीच टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आपटले.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने व्यवहारा दरम्यान ९५५ अंश आपटी नोंदविल्यानंतर बुधवारच्या तुलनेत ८८५.७२ अंश घसरण नोंदविली. सत्रअखेर मुंबई निर्देशांक ३१,१२२.८९ वर स्थिरावला. परिणामी बुधवारचा त्याचा ३२ हजाराचा टप्पाही मागे पडला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात बुधवारी २४०.८० अंश घसरण होऊन ९,१४२.७५ वर व्यवहार थांबला. निफ्टीत २.५७ टक्के तर सेन्सेक्समध्ये २.७७ टक्के घसरण नोंदली गेली. जागतिक प्रमुख निर्देशांकातील घसरणसाथही येथे लाभली. बुधवारी भांडवली बाजार व्यवहारापूर्वी केंद्र सरकारच्या घसघशीत  आर्थिक सहकार्याच्या अपेक्षेने तेजी नोंदली गेली होती. मात्र सरकारचे हे अर्थ साहाय्य थेट लाभ देणारे नसल्याबद्दलची प्रतिक्रिया गुंतवणूकदारांच्या समभाग विक्री धोरणावरून दिसून आली.

सेन्सेक्समधील ३० कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र समूहातील टेक महिंद्रचा समभाग सर्वाधिक, ५.२४ टक्क्य़ांसह खाली आला. त्याचबरोबर इन्फोसिस, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, एनटीपीसी आदीही घसरले. लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा यांचे मूल्य २.२८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, बँक, तेल व वायू निर्देशांक ३.६० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

२ लाख कोटींना फटका

दोन टक्क्य़ांहून अधिक निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची १.९९ लाख कोटी रुपयांची मालमत्ता लयाला गेली. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सत्रअखेर १२२.६८ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. केंद्र सरकारच्या अर्थ साहाय्याच्या नेमक्या परिणामांबाबत साशंक असलेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विक्री केल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. तर जागतिक भांडवली बाजारातील घसरणीमुळे येथील प्रमुख निर्देशांकांमध्येही नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्याचे जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.