सप्टेंबरमधील गुंतवणुकीत वार्षिक तुलनेत ८२ टक्क्यांनी घट

नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष योजना जाहीर केली. यामुळे देशात अनेक तरुणांनी नवउद्यमी होण्याचा निर्धार करत व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. मात्र कालांतराने अपरिहार्य आर्थिक चक्रव्यूहात सापडलेले हे तरुण नवउद्यमी तग धरू शकले नाहीत. अनेकांना आपला नवोद्योगाचा गाशा गुंडाळावा लागला आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला असून, सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या आकडय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ८२ टक्क्य़ांनी घट झाल्याचे समोर आले आहे. तर महिन्यागणिक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत गुंतवणूक ६१ टक्के घटली आहे.

नवउद्योग सुरू होण्याच्या प्रमाणाबरोबरच बंद होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत ५०० हून अधिक भारतीय नवउद्योग बंद झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अधिक सजग झाले आहेत. गुंतलेल्या पैशावर अपेक्षित परताला मिळत नसल्यामुळे अनेक गुंतवणूकदार नवउद्यमींकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात देशात ७२ कंपन्यांना निधी उभारण्यात यश मिळाले आहे. यापैकी २४ व्यवहारांच्या किमती जाहीर झाल्या असून त्यानुसार २५ कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा राहिला आहे. तर निधी उभारणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतही १२ टक्क्यांनी घट झाल्याचे ‘आयएनसी ४२’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. या महिन्यात वित्त क्षेत्राशी संबंधित केवळ एकाच कंपनीला निधी मिळवता आला आहे. वित्त कंपन्यांना निधी मिळण्याचे प्रमाण मे महिन्यापासून कमीच होत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. या महिन्याभरात १९ कंपन्यांचे विलीनीकरण झाले असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१६ टक्क्यांनी वाढले आहे.

जागतिक अर्थ प्रतिकूलतेचा विचार करता सध्या नवउद्योगांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी नोंदविले आहे. बाजारात फिरणारा निधी काही प्रमाणात गोठला असून त्याला वाट मिळाल्यावर हे चित्र बदलू शकेल, असेही घैसास यांनी नमूद केले. याचबरोबर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या अनेकदा व्यवसाय ते व्यवसाय (बी टू बी) सेवांसाठी गुंतवणूक करण्यात इच्छुक असतात. व्यवसाय ते ग्राहक (बी टू सी) सेवांमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही कमी असल्याचे घैसास यांनी नमूद केले. यामुळे आजही ‘बीटूबी’ उद्योगांना निधी मिळत असल्याचेही ते म्हणाले.

‘आयएनसी ४२’ अहवालाच्या नोंदी

  • दिल्ली, एनसीआरमध्ये २१ कंपन्यांना ४ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा राहिला आहे.
  • बेंगळुरूमध्ये २१ कंपन्यांना नऊ कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा राहिला आहे.
  • मुंबईत नऊ कंपन्यांना सहा कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा राहिला आहे.
  • इतर शहरांमध्ये २३ कंपन्यांना सात कोटी ६० लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा राहिला आहे.