अमेरिकेची निर्मिती असलेल्या ‘सब-प्राइम’नंतरची सर्वात मोठी सत्रआपटी येथील भांडवली बाजारांनी बुधवारी अनुभवली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक ४ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आपटले. याच व्यवहाराची अनोखी नोंदही झाली.

नव्या वित्त वर्षांच्या पहिल्याच दिवशीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदार ३.२० लाख कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे गेले. बुधवारअखेर देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ११०.२८ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. २०१९-२० या सरत्या वित्त वर्षांची अखेर बाजाराने तेजीसह केली होती. तर गेल्या एकूण आर्थिक वर्षांत मुंबई शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांना ३७.५९ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

शुक्रवारसह गेल्या दोन व्यवहारात मिळून मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती एकूण ४.८२ लाख कोटी रुपयांनी रोडावली. गुरुवारी बाजारात व्यवहार बंद होते.