06 August 2020

News Flash

निर्देशांकांची दौड कायम!

करोना लशीबाबत गुंतवणूकदारांना आशा

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूबाधेला प्रतिबंध करणाऱ्या लशीच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, जागतिक भांडवली बाजारात त्यामुळे उत्साही कल दिसून आला. या प्रवाहाला अनुसरून, स्थानिक बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक उसळताना दिसून आले.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील दमदार मजबुतीनेही बाजारातील खरेदी उत्साहाला खतपाणी घातले. परिणामी गुरुवारचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ४२९.२५ अंशांच्या कमाईसह ३५,८४३.७० या पातळीवर पोहोचला. एके समयी सेन्सेक्सने ६०० अंशांची उसळी दर्शविली होती. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही १२१.६५ अंशांची भर गुरुवारअखेरीस १०,५५१.७० पातळीवर स्थिरावला.

महिंद्र अँड महिंद्रचा समभाग सेन्सेक्समधील सर्वाधिक ६.०५ टक्क्य़ांची वाढ नोंदविणारा समभाग ठरला. टायटन, टाटा स्टील, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टीसीएस या समभागांनीही चमकदार वाढ नोंदविली. त्या उलट अ‍ॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल हे समभाग घसरणीत राहिले.

जर्मनीतील बायोएनटेक आणि अमेरिकेत फायझर या कंपन्यांनी संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पात, करोनावर संभाव्य लशीच्या दिशेने यशस्वी प्रारंभिक चाचण्यांसह महत्त्वपूर्ण प्रगती साधल्याचे वृत्त आहे. बरोबरीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील संकटछाया दूर सारणाऱ्या बेरोजगारीसंबंधीच्या आकडेवारीबाबत जगभरच्या भांडवली बाजारात आशावाद आहे. परिणामी आशियाई बाजारात शांघाय, निक्केई, हँगसेंग या प्रमुख निर्देशांकांनी गुरुवार चांगल्या वाढीची कामगिरी नोंदविली. त्यांची दखल घेत, भारतातही सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सत्र-आरंभापासूनच सकारात्मक कल संपूर्ण दिवसाच्या व्यवहारात कायम ठेवला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत एकाच व्यवहारात ५६ पैशांनी मजबूत होत रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर ७५.०४ असे झाले. रुपयाच्या मजबुतीचा बाजारावर अनुकूल परिणाम म्हणून परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीत वाढ झाली. बीएसई मिड-कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये एक टक्क्य़ांहून अधिक झालेली वाढ ही बाजारातील खरेदी ही सर्वव्यापी होती असे सूचित करणारी आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाच्या संकेताने समभाग मूल्यवृद्धी

मुंबई : खासगी कंपन्यांना प्रवासी गाडय़ा चालविण्याची परवानगी देण्याची, पर्यायाने रेल्वे सेवेच्या खासगीकरणाच्या योजनेची केंद्र सरकारने औपचारिक घोषणा केल्यानंतर, गुरुवारी रेल्वे क्षेत्राशी संलग्न समभागांनी १३ टक्क्य़ांपर्यंत उसळी घेतली. टेक्समॅको रेल अँड इंजिनीयरिंगचा समभाग १२.८६ टक्के, सिमको १० टक्के, रेल विकास निगम ७.१४ टक्के, टिटागढ व्ॉगन्स ४.९५ टक्के आणि आयआरसीटीसी लिमिटेडचा समभाग ३.५६ टक्क्य़ांनी गुरुवारच्या व्यवहारात वधारताना दिसला. सध्या आयआरसीटीसीकडून तीन मार्गावर अशा खासगी प्रवासी गाडय़ा चालविल्या जात असून, याच प्रयोगाचा विस्तार आता १०९ मार्गावर करण्याच्या दिशेने सरकारने पावले टाकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:11 am

Web Title: investors hope for corona vaccine abn 97
Next Stories
1 जागतिक बँकेचे भारताला विक्रमी कर्ज
2 समभाग, फंड खरेदी महाग
3 लॉकडाउनमुळे भारतीय कर्मचाऱ्यांचे हाल… पीएफ खात्यांची आकडेवारी पाहून व्हाल थक्क
Just Now!
X