सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

परदेशी व देशी गुंतवणूकदारांना दिलासा देणारी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून अद्याप तरी झालेली नाही. पंतप्रधानांची वित्त मंत्रालयाशी बोलणी चालू आहेत. म्हणूनच पहिल्या दोन दिवशी मोठे चढ-उतार पाहिलेल्या बाजाराने शेवटच्या दिवशी सावध पवित्रा घेतला..

केवळ तीनच दिवस कामकाज झालेल्या या आठवडय़ात बाजाराचा प्रत्येक दिवस निराळा ठरला. पहिल्याच दिवशी मंगळवारी बाजार पडला, दुसऱ्याच दिवशी मोठी वाढ दाखवली तर शेवटच्या दिवशी बाजार सुस्त दिसला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत सोमवारी झालेल्या जिओ फायबरसह इतर मोठय़ा घोषणांचे पडसाद मंगळवारी बाजारात उमटले. जागतिक आर्थिक उलाढालींमुळे दीड टक्क्यांहून जास्त पडलेल्या बाजारात रिलायन्सचा भाव जवळजवळ १० टक्क्यांनी वाढला. जगातील सर्वात फायदा कमावणाऱ्या सौदी आराम्को कंपनीला रिलायन्स तिच्या तेल व रसायन उद्योगाचा २० टक्के वाटा विकणार आहे. भविष्यात जिओ आणि रिलायन्स रिटेल या कंपन्यांना स्वतंत्र बनवून ही कंपनी स्वत:ला १८ महिन्यांत कर्जमुक्त करणार आहे. रिलायन्स आता नव्या पर्वाला सुरुवात करणार हे नक्की.

अर्थसंकल्पानंतर सलग चार आठवडे घसरणाऱ्या बाजाराला गेल्या आठवडय़ात मिळालेला किंचितसा दिलासाही टिकून न राहता, आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्स) २३१ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) ६१ अंशांची पुन्हा एकदा साप्ताहिक घसरण दिसली.

भारतातील सर्वात मोठय़ा औषधी कंपनीने अर्थात सन फार्माने गेल्या दोन वर्षांतील विविध आघाडय़ांवरील पीछेहाटीच्या पाश्र्वभूमीवर पहिल्या तिमाहीत चांगले निकाल जाहीर करून अपेक्षा उंचावल्या आहेत. सध्या सर्वच आघाडीच्या औषध कंपन्यांचे भाव गेल्या पाच वर्षांतील निम्न स्तरांवर आले आहेत. परंतु या क्षेत्रामधे गुंतवणूक करताना एखादा फार्मा म्युच्युअल फंड घेणे श्रेयस्कर. कारण अमेरिकी अन्न व औषध संचालनालयाचे ऑडिट कधी कुणाला दगा देईल सांगता येत नाही.

या आठवडय़ात इंद्रप्रस्थ गॅसचे तिमाही निकाल जाहीर झाले. गेल्या वर्षांच्या तुलनेत नफ्यात २४ टक्के वाढ झाली. भारतामध्ये द्रवरूप इंधनावरून गॅस वापरण्याकडे कल वाढला आहे. कंपनी आता उत्तरेकडील इतर प्रदेशात आपला विस्तार करीत आहे. या समभागातील गुंतवणूक आशादायक वाटते.

एका सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतातील मंदीचा परिणाम वाहन उद्योगावर ज्या प्रमाणात झाला आहे त्या प्रमाणात सीमेंट, पेंट, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर झालेला नाही. मोबाइल, वॉिशग मशीन, फ्रिज, एसी, आदी वस्तूंना गरज समजून ग्राहक त्यांची खरेदी पुढे ढकलत नाहीत. गेल्या तिमाहीतील काही निकालांवरूनही हे स्पष्ट होईल. यातील एक आघाडीची कंपनी म्हणजे व्हर्लपूल. कंपनी कर्जमुक्त तर आहेच, पण गेल्या वर्षांचे तसेच तिचे तिमाहीचे निकालही उत्तम आहेत. पडणाऱ्या बाजारात घेऊन ठेवण्यासारखा हा समभाग आहे.

परदेशी व देशी गुंतवणूकदारांना दिलासा देणारी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून अद्याप तरी झालेली नाही. पंतप्रधानांची वित्त मंत्रालयाशी बोलणी चालु आहेत. या आठवडय़ातील पहिल्या दोन दिवशी मोठे चढ-उतार पाहिलेल्या बाजाराने शेवटच्या दिवशी सावध पवित्रा घेतला. जागतिक घडामोडी व मंदीच्या सावटामुळे दबावाखाली असणारा बाजार अर्थ मंत्रालयाने काही सकारात्मक  घोषणा केली तर पुढील आठवडय़ात तात्कालिक तेजी दाखवू शकतो.