मुंबई : भांडवली बाजाराचा कल अनिश्चित असताना, गुंतवणूकदारांच्या उडय़ा पडून इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयआरसीटीसीची प्रारंभिक भागविक्री प्रक्रिया दमदार यशस्वी ठरली. मागील गुरुवारी ही भागविक्री संपुष्टात आली आणि गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या समभागांसाठी ११२ पटीने अधिक अर्ज भरले गेल्याचे आढळून आले. आता येत्या गुरुवारी होत असलेल्या समभागांच्या प्रत्यक्ष वितरणाकडे या भागविक्रीत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

आयआरसीटीसीच्या भागविक्रीचे निबंधक असलेल्या अलंकित असाइनमेंट्सकडून, समभागांचे अर्जानुरूप वितरण आणि परताव्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. येत्या गुरुवारी दुपापर्यंत हे वितरण अथवा वितरण न झाल्यास रकमेचा परतावा गुंतवणुकदारांना दिला जाईल. तर प्रत्यक्ष समभागांचे मुंबई (बीएसई) तसेच राष्ट्रीय (एनएसई) शेअर बाजारांमध्ये सूचिबद्धता सोमवारी, १४ ऑक्टोबरला होणे अपेक्षित आहे. विविध दलाली पेढय़ांचा कानोसा घेतला असता, आयआरसीटीसीचे समभाग प्रत्येकी ५२० ते ५२५ रुपये किमती दरम्यान म्हणजे ६४ टक्के अधिमूल्यासह होऊ घातली आहे.

आयआरसीटीसीच्या ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या प्रारंभिक भागविक्रीतून २.०१६ कोटी समभाग विक्रीसाठी खुले झाले होते आणि ६४५ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात भागविक्रीच्या चार दिवसांत, गुंतवणूकदारांकडून २२५ कोटींहून अधिक समभागांसाठी मागणी येऊन, ७२ हजारांहून कोटींहून अधिक मूल्याची बोली लावली गेली. आयआरसीटीसीचे समभाग प्रत्येकी ३१५ ते ३२० रुपये या किमतीदरम्यान विकले गेले आहेत. भागविक्रीत सहभागी होणाऱ्या छोटय़ा वैयक्तिक गुंतवणूकदारांना आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खरेदी मूल्यावर प्रति समभाग १० रुपयांची सवलत दिली गेली आहे. भागविक्रीत वैयक्तिक छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शाच्या तुलनेत सुमारे १५ पटीने अधिक समभागांसाठी बोली लावणारे अर्ज आले आहेत.

रेल्वे तिकिटांचे ई-आरक्षण तसेच रेल्वे प्रवाशांना खानपान व पेयजलाच्या पुरवठय़ाचा एकाधिकार असलेल्या आयआरसीटीसीच्या समभागांच्या शेअर बाजारातील सूचिबद्धतेपश्चात एकूण बाजार भांडवल ५,१२० कोटी रुपये होईल. या १०० टक्के सरकारी मालकीच्या कंपनीतील सरकारचा हिस्सा १२.४ टक्क्य़ांनी सौम्य होऊन तो ८७.५ टक्क्य़ांवर येईल.  भागविक्रीतून उभारला जाणारा सर्व ६४५ कोटी रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा होईल.