गेल्या पाच दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये धुळधाण उडालेली बघायला मिळालेली असून गुंतवणूकदारांचे तब्बल 8.47 लाख कोटी रुपये हवेत विरून गेले आहेत. या पाच दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली आहे.
30 शेअर्सचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सोमवारी 536.58 अंकांनी घसरला व 36,305.02 स्थिरावला. पाच सत्रांमध्ये सेन्सेक्सने 1,785.62 अंकांची आपटी अनुभवली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांकही सोमवारी 168.20 अंकांनी घसरून 11 हजारांच्या पातळीच्या खाली 10,974.90 वर बंद झाला. शेअर बाजारामध्ये सध्या अत्यंत निरुत्साहाचे वातावरण असून मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य 8 लाख 47 हजार 974.15 कोटी रुपयांनी घसरले व 1 कोटी 47 लाख 89 हजार 45 कोटी रुपये इतके राहिले आहे. रोखतेची चणचण व अमेरिकेचे चीनशी ताणले गेलेले व्यापारी संबंध ही मुख्य कारणं असून कच्च्या तेलाच्या भावांची अशाश्वतताही शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम करणारी ठरली.

सेन्सेक्स व निफ्टीच्या पडझडीमागे ही आहेत मुख्य पाच कारणं:

– आयटी व टेक्नॉलॉजी वगळता बहुतेक सगळ्या बड्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करण्याचा मार्ग गुंतवणूकदारांनी निवडला.

– सोमवारी रुपयाही 53 पैशांनी घसरला, याचा प्रतिकून परिणाम बाजारात दिसून आला.

– जागतिक बाजारातही शुभवार्तेचा अभाव होता, उलट तीन व अमेरिकेमधल्या व्यापार युद्धाची गडद छाया बाजारावर पडली.

– कच्च्या तेलाचे भाव चार वर्षांतील उच्चांकावर असून ते आणखी वाढण्याची भीती आहे; याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.

– जागतिक बाजारातील घडामोडींमुळे भारताच्या चालू खात्याची तूट वाढत असून, विदेशी वित्तीय संस्था भारतीय शेअर बाजारातून निधी काढून घेण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारामध्ये उमटत आहे.