26 February 2021

News Flash

गुंतवणूकदारांना २.५५ लाख कोटींचा फटका

आर्थिक मंदीच्या चिंतेने निर्देशांकांची वर्षांतील सर्वात मोठी २ टक्के घसरगुंडी

आर्थिक मंदीच्या चिंतेने निर्देशांकांची वर्षांतील सर्वात मोठी २ टक्के घसरगुंडी

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा पाय  खोलात जात असल्याचे पाहून भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री केल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारी दणक्यात आपटले. मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांना एकाच सत्रात २.५५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सेन्सेक्स, निफ्टीने गेल्या ११ महिन्यातील सर्वात मोठी आपटी अनुभवली.

सहा वर्षांच्या नीचांकाला पोहचलेला अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर, औद्योगिक उत्पादन दर आणि अर्थ-पायाभूत आठ प्रमुख क्षेत्रांच्या निर्देशांकांतील अवनतीचे  चित्र देशाच्या अर्थकारणाचा निसरडा प्रवास दर्शवत असल्याचे गंभीर सावट भांडवली बाजारावरही पडले. परिणामी मंगळवारच्या व्यवहारात निफ्टीसह सेन्सेक्सनेही एकाच व्यवहारात २ टक्क्यांहून अधिक घसरगुंडी नोंदविली.

तीन दिवसांच्या विश्रामानंतर सुरू झालेल्या भांडवली बाजाराचे मंगळवारचे व्यवहार सुरुवातीपासूनच घसरणीचे राहिले. दिवसअखेर गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स २.०६ टक्क्यांनी तर निफ्टी २.०४ टक्क्यांनी आपटला. यामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल २,५५,५८५.५६ कोटी रुपयांनी रोडावत १३८.४२ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

मुंबई भांडवली बाजारातील सेन्सेक्समधील एकूण ३० पैकी अवघे दोनच समभागाचे मूल्य मंगळवारी वाढू शकले. तर बाजारातील एकूण समभाग कंपन्यांपैकी २०० कंपन्यांचे समभाग त्यांच्या वर्षांच्या मूल्यतळाला गवसणी घालणारे ठरले. मुंबई शेअर बाजारातील छोटय़ा गुंतवणूकदारांचे पसंतीचे मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकही तुलनेत प्रमुख निर्देशांकांपेक्षा कमी, मात्र १.६५ टक्क्यांपर्यंत घसरले.

वाहन, बँक समभागांना विक्रीचा तडाखा

गेल्या ११ महिन्यांतील एकाच व्यवहारातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात मंगळवारी वाहन व बँक क्षेत्रातील समभागांमधील मूल्य हालचाल उल्लेखनीय राहिली. सलग दहाव्या महिन्यात, ऑगस्टमध्येही विक्रीतील घसरण अनुभवावी लागली.

बाजारात सूचिबद्ध वाहन क्षेत्रातील समभाग ३.५ टक्क्यांपर्यंत घसरले. त्याचबरोबर शुक्रवारी अर्थमंत्र्याच्या विलीनीकरणाच्या निर्णयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागांचे मूल्य १० टक्क्यांपर्यंत खाली आले.

डॉलरपुढे रुपयाची ७२ च्या पुढे गटांगळी

भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचे निर्गमन आणि अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापार युद्धाच्या सावटाने येथील परकीय चलन विनिमय मंचावर मंगळवारी रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला. परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात एकदम ९७ पैशांनी कमी होत ७२.३९ वर स्थिरावले. विकास दर, औद्योगिक उत्पादन आणि प्रमुख पायाभूत क्षेत्र यातील घडामोडीचे सावटही येथे उमटले. रुपयाचा मंगळवार बंदअखेरचा स्तर हा गेल्या नऊ महिन्यांतील किमान राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 3:51 am

Web Title: investors lose over 2 lakh crore in stock market zws 70
Next Stories
1 अ‍ॅसेट अलोकेशन : गुंतवणुकीचे महत्वाचे तत्त्व
2 एकत्रीकरणातून बँकांच्या पतक्षमता, नफाक्षमतेत वाढ अशक्यच
3 निर्देशांक खोलात; रुपयाही घसरला
Just Now!
X