सातत्यपूर्ण परतावा कामगिरीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंड अग्रणी

म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स फंड वर्गवारीतील एकूण मालमत्ता वर्षभरात ५० हजार कोटींवरून, सध्या सव्वा लाख कोटी रुपयांपर्यंत फुगली आहे. मासिक लाभांशाच्या रूपाने नियमित लाभ हे त्यामागील केवळ एकमेव कारण नसून, शेअर बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा अधिक लाभ आणि कर कार्यक्षमताही अशा गुंतवणुकीने साधली आहे. किंबहुना सध्या भांडवली बाजाराने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली असताना, बॅलन्स्ड फंड हेच तुलनेने जोखीम कमी असलेला गुंतवणूक पर्याय बनला आहे.

अनेक फंड घराण्यांच्या बॅलन्स्ड फंड योजनांनी अलीकडच्या काळात वाढलेल्या गुंतवणूक ओघाने तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेची पातळी गाठली आहे. आयसीआयसीय प्रुडेन्शियन बॅलन्स्ड फंडाने ऑगस्ट २०१७ अखेर १६,३९४ कोटी रुपयांची एकंदर मालमत्ता गाठली. तर एचडीएफसी प्रुडन्स फंड आणि एचडीएफसी बॅलन्स्ड फंडानेही अनुक्रमे २९,१६९ कोटी व १३,८२४ कोटी रुपयांची मालमत्ता गाठली आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ बॅलन्स्ड ९५ फंड, एसबीआय मॅग्नम बॅलन्स्ड फंडांनी मालमत्तेत गेल्या वर्षभरात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या वर्गवारीत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाने सर्वाधिक १८.१० टक्के वार्षिक सरासरी दराने परतावा दिला आहे.

बॅलन्स्ड फंड हे त्यांच्या रचनेप्रमाणे, या फंडातून समभागांमध्ये ६५ टक्क्य़ांपर्यंत आणि उर्वरित रोखे पर्यायात गुंतवणूक केली जाते. यातून गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील वृद्धी सहभागाची संधी मिळतेच, तर ३५ टक्के हिस्सा हा रोख्यांमध्ये गुंतलेला असल्याने बाजार अस्थिरतेच्या स्थितीत जोखीम संतुलन सुनिश्चित केले जाते. समभाग आणि रोख्यांत योग्य संतुलन साधून, समभाग गुंतवणुकीसाठी ‘कॉन्ट्रॅरियन’ गुंतवणूक पद्धतीचे अनुकरण हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाच्या लोकप्रियतेचे कारण आहे, असे या फंडाचे निधी व्यवस्थापक एस. नरेन यांनी सांगितले.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाच्या प्रारंभापासून म्हणजे २ एप्रिल २००२ रोजी १०,००० रुपये गुंतवणुकीचे मूल्य १,२९,२६२ रुपये झाले असून, परताव्याचा दर १८.१० टक्के आहे. याच काळात फंडाच्या संदर्भ निर्देशांकाचा परतावा जवळपास निम्मा ६२,८०१ रुपये असून, परताव्याचा दर १२.६९ टक्के आहे. गत १० वर्षांत मासिक १०,००० रुपयांच्या ‘एसआयपी’ करणाऱ्यांना या फंडाने १६.३२ टक्के दराने परतावा दिला आहे.