01 June 2020

News Flash

अर्थसाहाय्यावर गुंतवणूकदार नाराज

सेन्सेक्समध्ये हजारअंश तर निफ्टीत त्रिशतकी आपटी

संग्रहित छायाचित्र

करोना आणि टाळेबंदीचा सामना करणाऱ्या काही क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सलग पाच दिवस अर्थ साहाय्य जाहीर करूनही भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात त्याचे विपरित पडसाद उमटताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रअखेर, शुक्रवारच्या तुलनेत थेट हजाराहून अधिक अंशांनी आपटला. परिणामी त्याने त्याचा ३१ हजाराचा स्तरही सोडला. निफ्टीनेही जवळपास ३.४५ टक्के निर्देशांक आपटी एकाच व्यवहारात नोंदवित त्रिशतकी घसरणीसह ८,८०० पर्यंतचा तळ गाठला.

सप्ताहारंभीच्या पहिल्याच सत्रात बसलेल्या ३.४४ टक्के निर्देशांक घसरणफटक्यामुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीला एकाच व्यवहारात तब्बल ३.६५ लाख कोटी रुपयांची ओहोटी लागली. हजार अंशांहून खाली येणाऱ्या प्रमुख निर्देशांकामुळे मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ११९ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

देशव्यापी टाळेबंदी महिनाअखेपर्यंत विस्तारल्याने व्यवसाय चिंतेतून भांडवली बाजारात सूचिबद्ध आदरातिथ्य तसेच मनोरंजन क्षेत्रातील समभागांचे मूल्य सोमवारी मोठय़ा फरकाने घसरले. आयनॉक्स, पीव्हीआर तसेच शेलेट हॉटेल्स, इंडियन हॉटेल कंपनीसारख्या कंपन्यांचे समभाग मूल्य तब्बल १५ टक्क्य़ांपर्यंत रोडावले.

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मात्र संमिश्र हालचाल नोंदली गेली. केंद्र सरकारने रविवारी या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथील करण्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारात संबंधित समभागांवर अपेक्षितरित्या उमटले. हिंदुस्थान एरोनॉट्किस, अ‍ॅस्ट्र मायक्रोव्हेव प्रॉडक्ट्सचे मूल्य वाढले. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्सचे मूल्य मात्र खाली आले. त्याचबरोबर व्यवसाय आणखी ठप्प राहण्याच्या धास्तीने नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग ७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, स्पाईसजेट यांचा क्रम होता.

सरकारच्या योजना घोषणेमुळे बँकांचे थकित कर्जे वाढण्याच्या शंकेतून सोमवारी या क्षेत्रातील समभागांचे मूल्य १० टक्क्य़ांपर्यंत आपटले. यामध्ये खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश राहिला. मुंबई शेअर बाजारातील एकूणच बँक निर्देशांक ६.६९ टक्क्य़ांनी घसरला.

मुंबई शेअर बाजारातील बँक, वित्त, वाहन, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, तेल व वायू, पोलाद, ग्राहकपयोगी वस्तू असे अधिकतर क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत होती. तर मिड कॅप व स्मॉलक निर्देशांकही जवळपास प्रत्येकी ४ टक्क्य़ांपर्यंत खाली आले.

अखेर समभाग मूल्यवाढ

रिलायन्स इंडस्ट्रीज वैश्विक गुंतवणूकदार जनरल अटलांटिकला जिओ प्लॅटफॉम्र्स या डिजिटल व्यवसायाचे समभाग विक्री करणार असल्याच्या रविवारच्या घोषणेमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होतानाच २ टक्के पर्यंत तेजी नोंदवली. दरम्यान, सरकारने आर्थिक आघाडीवर केलेले उपाय अपुरे वाटल्याने परकीय गुंतवणूकदारांनी एकू णच दिवसभरात केलेल्या विक्रीमुळे सकाळच्या तेजी माहोल बाजार बंद होताना टिकला नाही. समभाग बाजार बंद होताना रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग शुक्रवारच्या तुलनेत १.०७  टक्के  घसरत १,४८२ रुपयांवर बंद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 3:08 am

Web Title: investors upset over financing abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बँकांच्या थकीत कर्जात वाढ होणार
2 धन धनाधन… रिलायन्स जिओमध्ये साडेसहा हजार कोटींची परदेशी गुंतवणूक
3 परदेशी गुंतवणूकदारांसाठी जमीन राखीव
Just Now!
X