अ‍ॅपलचा आयफोन तसेच आयपॅड व आयपॉड यापुढे महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. फोन तयार करणारी फॉक्सकॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतचे संकेत दिल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘रॉयटर’जवळ केला आहे.
भारतात यापूर्वीही प्रकल्प असलेल्या तैवानस्थित फॉक्सकॉनमार्फत सध्या चीनमध्ये अधिक प्रमाणात आयफोन तयार केले जातात. मात्र चीनमधील सध्याची अर्थ व निर्मितीस्थिती लक्षात घेता कंपनी अन्यत्र वळण्याची चाचपणी करत आहे. ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन म्हणून फॉक्सकॉनचा आयफोन निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात साकारण्याची चिन्हे असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीचे शिष्टमंडळ निर्मिती ठिकाण निश्चितीसाठी महिन्याभरात दाखल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. २०२० पर्यंत कंपनीचे भारतात १० ते १२ निर्मिती केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
आयफोनबरोबर स्पर्धा असलेल्या कोरियन कंपनी सॅमसंगचा सध्या उत्तर भारतात मोबाईल उत्पादन प्रकल्प आहे. विदेशी मोबाईल कंपन्यांना सध्या स्थानिक मायक्रोमॅक्स, स्पाईस, लावा तसेच शिओमी, जिओनी आदी चीनी कंपन्यांशी स्पर्धा सुरू आहे.