दक्षिणपूर्व आशियातील सर्वाधिक लांबीचा ठरणाऱ्या बोगदा बांधणीचे कंत्राट महाराष्ट्रातील आघाडीच्या आयआरबीला मिळाले आहे. जम्मू आणि काश्मिरमधील झोझिला येथील १४.०८ किलो मीटर लांबीच्या या बोगद्यासाठी कंपनीला १०,५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडला केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक आणि महामार्ग खात्याकडून जम्मू-काश्मीरमधील झोझिला पास टनल या दक्षिणपूर्व आशियामधील सर्वात लांब बोगद्याचे बांधकाम, परिचालन आणि देखभाल यासाठी बहालीचे पत्र देण्यात आले आहे.
प्रकल्प शुल्काच्या अनुषंगाने हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प असून यामध्ये रचना, बांधकाम, अर्थसाहाय्य, परिचालन आणि हस्तांतरण (वर्षांसन) पद्धतीवर जम्मू-काश्मीर राज्यामधील एनएच-१ कडे जाणारे रस्ते (श्रीनगर-सोनमर्ग-गुमरी रोड) समाविष्ट असतील.
हा प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख यादरम्यान अत्यावश्यक असलेला संपर्क सर्व ऋतुंमध्ये साधता येईल. हिवाळ्यादरम्यान भरपूर हिमवृष्टीमुळे तो अनेकदा तुटतो. त्यामुळे हा प्रकल्प देशाच्या पायाभूत सेवा क्षेत्रातही महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये १४,०८ किलो मीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम आणि १०.८ किलो मीटरच्या जोडरस्त्याचे बांधकाम, तीन उभे व्हेंटिलेशन शाफ्ट, ७०० मीटरची स्नो गॅलरी आणि अवधाव संरक्षण उपाययोजना इत्यादींचा समावेश आहे.
कंपनीचे अनुमानित प्रकल्प शुल्क १०,०५० कोटी असून व बांधकाम कालावधी सात वर्षांचा आहे. प्रकल्पाचा सवलत कालावधी २२ वष्रे आहे. आयआरबीला रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाकडून ९८१ कोटींचे अर्धवार्षकि वर्षांसन मिळेल, ज्याची सुरुवात प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर होईल आणि जे सवलतीच्या कालावधीपर्यंत वर्षांतून दोनवेळा मिळेल, असे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी स्पष्ट केले.
आयआरबी कंपनी या प्रकल्पामार्फत नवव्या राज्यामध्ये विस्तारत असून कंपनीच्या बांधकामासाठीच्या मागण्या वाढून १६,४३० कोटीपर्यंत नोंदवल्या गेल्या आहेत. भांडवली बाजारात सूचिबद्ध आयआरबीचा समभाग सोमवारी व्यवहारात ५ टक्क्य़ांहून अधिकने वाढला.

आमचे मनुष्यबळ हिमालयीन प्रदेशातील आव्हानांना तोंड देत नियोजित वेळेत बोगद्याचे बांधकाम पूर्ण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
– वीरेंद्र म्हैसकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, आयआरबी इन्फ्रा.डेव्ह. लि.