रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे. आता त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांना फॉर्च्युनच्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान देण्यात आलं आहे. वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, राजकारण आणि माध्यमं व मनोरंजन या विभागातील फॉर्च्युन यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक यादीत जगभरातील ४० जणांच्या ज्यांचं वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे अशा नावाचा समावेश करण्यात आला आहे. ईशा आणि आकाश अंबानी यांचं नाव तंत्रज्ञान या विभागाच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे. तर बायजूचे फाऊंडर बायजू रविंदरन यांनादेखील या फॉर्च्युनच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

फॉर्च्युनच्या अहवालानुसार ईशा आणि आकाश अंबनी यांनी रिलायन्स जिओला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोघांनीच फेसबुकसोबत ९.९९ टक्के हिस्सा विकत ५.७ अब्ज डॉलर्सची मेगा डिलही पूर्ण केली. गूगल, क्वालकॉम, इंटेल यांसारख्या कंपन्यांना रिलायन्ससोबत जोडणं तसंच गुंतवणूक आणण्याचं काम यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आल्याचंही नमूद केलं आहे. आकाश अंबानीनं २०१४ मध्ये ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेत आपल्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. तर ईशानंदेखील येल, स्टॅनफोर्डसारख्या विद्यापीठांतून शिक्षण घेत आपल्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

जिओमार्ट लाँच करण्यातही आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांनी महत्त्वाची भूमिका साकारल्याचं फॉर्च्युननं म्हटलं आहे. मे महिन्यातच रिलायन्सनं जिओमार्ट लाँच केलं होतं. आजमितीस दररोज जिओमार्टवरून ४ लाख ऑर्डर्स बूक करण्यात येतात. भारतात झपाट्यानं वाढणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रात रिलायन्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसमोर आव्हान उभं करत असल्याचं म्हटलं जात आहे.