राज्यात दोन पोलाद प्रक्रिया प्रकल्प असलेल्या लोहा इस्पात लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला असून, प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून २०२ ते २१३ कोटी रुपयांचे भांडवल उभे राहणे कंपनीला अपेक्षित आहे. प्रत्येकी ७७ रु. ते ८० रु. या किंमत पट्टय़ाअंतर्गत कंपनीच्या भागविक्रीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, ती गुरुवार, २० मार्चपर्यंत सुरू राहील. या १०० टक्के बुक-बिल्डिंग प्रक्रियेच्या भागविक्रीत कंपनीचे १० रु. दर्शनी मूल्याचे २.६७ कोटी समभाग विक्रीसाठी खुले झाले आहेत.
लोहा इस्पात ही आपल्या मुख्य पुरवठादारांसाठी मागणीनुरूप एचआर कॉइल्स आणि सीआर कॉइल्स अशा पोलादावर प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची आपल्या खोपोली आणि तळोजा (रायगड) येथील प्रकल्पातून घेते. देशातील वाहन उद्योग, बेअरिंग, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग उद्योग, पाइप उत्पादक आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात तिचा मोठा ग्राहकवर्ग आहे. कंपनीच्या या दोन्ही विद्यमान प्रकल्पात रु. ३५८.७६ कोटींच्या गुंतवणुकीतून विस्तार कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहचला असून, त्यातून उत्पादन क्षमता सध्याच्या वार्षिक नऊ लाख मेट्रिक टनांवरून २१ लाख ८२ हजार टनांपर्यंत वाढणार आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक खेळत्या भांडवलाची गरज या भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीद्वारे भागविली जाणार आहे.
अशा अनोख्या व्यवसाय क्षेत्रातील भारताच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी ही पहिलीच कंपनी असल्याचे लोहा इस्पातचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऋषी व्यास यांनी सांगितले. भागविक्रीपश्चात प्रवर्तकांचा कंपनीच्या भागभांडवलातील २६.४४ टक्के हिस्सा सौम्य होणार असून, या व्यतिरिक्त आणखी ४ टक्के भागभांडवल कंपनीने विदेशी वित्तसंस्थांना भागविक्री-पूर्व वितरण म्हणून प्रति समभाग ७८ रु. दराने अदा केले आहे.