वर्ष २०१९ मध्ये पाच लाख नवपदवीधरांना नोकरीची संधी

हैदराबाद : देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मरगळ झटकून पुन्हा वृद्धीपथावर परतत असल्याचे स्पष्टपणे दिसत असून, आयटी सेवा क्षेत्रासह नवउद्यमी क्षेत्रात आगामी वर्षांत म्हणजे २०१९ मध्ये नवपदवीधरांच्या भरतीला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

माहिती-तंत्रज्ञान उद्योगात सुरुवातीचे वेतनमान हे गेल्या सात वर्षे आहे त्या पातळीवर स्थिर होते, २०१८ मध्ये त्यात पहिल्यांदाच २० टक्क्यांची वाढ दिसून आली. २०१९ सालात हा वाढीचा क्रम सुरू राहिल्याचे दिसून येईल आणि एकूण तंत्रज्ञानाधारित सेवा उद्योगात पाच लाखांच्या घरात नवीन भरती होण्याचा आशादायी कयास इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे माजी वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांनी व्यक्त केला.

तथापि अमेरिकेत एच१बी व्हिसासंबंधी परिस्थिती आणखी प्रतिकूल बनताना दिसेल. मात्र भारतीय कंपन्यांनी पर्याय म्हणून जपान आणि अन्य दक्षिण आशियाई बाजारपेठेकडे होरा वळविला असल्याचे त्यांनी सांगितले. बडय़ा कंपन्यांकडून व्यापक विस्तारीकरण आणि समभागांची आकर्षक किमतीत पुनर्खरेदी दृष्टिपथात असल्याचे भागधारकांसाठीही आगामी काळ फलदायी ठरण्याचे संकेत पै यांनी दिले.

देशात सध्या नवउद्यमी संस्कृती जोम धरत असून, वेगवेगळ्या स्टार्ट-अप्समध्ये सुमारे ६,००,००० कर्मचारी कार्यरत आहेत. २०१८ सालात त्यापैकी १,५०,००० कर्मचारी सामावून घेतले गेले, तर आगामी २०१९ सालात आणखी २,००,००० लोकांना उमद्या वेतनमानाची रोजगार संधी या क्षेत्रातून येईल. माहिती-तंत्रज्ञान सेवा उद्योगातूनही आणखी अडीच ते तीन लाखांची नोकरभरती अपेक्षित असल्याचे पै यांनी सांगितले. देशात सध्या ३९,००० स्टार्टअप्स कार्यरत आहेत, दरसाल नवीन ५,००० स्टार्टअप्सची त्यात भर पडत आहे, असे त्यांनी सांगितले.