News Flash

साखरेपेक्षा गूळ महाग

वर्षभरापासून साखरेचा भाव वरचेवर नीचांक पातळी गाठत असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गूळ तयार करण्यावर शेतकरी भर देत असल्यामुळे साखर कारखाने चांगलेच अडचणीत आले आहेत.

| February 5, 2014 07:10 am

वर्षभरापासून साखरेचा भाव वरचेवर नीचांक पातळी गाठत असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गूळ तयार करण्यावर शेतकरी भर देत असल्यामुळे साखर कारखाने चांगलेच अडचणीत आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे उसाला प्रतिटन २५५० रुपये किमान भाव मिळाला पाहिजे यासाठी आग्रह धरला होता त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते याविषयी ब्रही काढत नाहीत
गतवर्षी पाऊस कमी असल्यामुळे उसाचे क्षेत्र ३० टक्क्यांनी घटले आहे त्यामुळे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. ऊस उपलब्ध करण्यासाठी कारखान्यांना इतरांच्या कार्यक्षेत्रात स्पर्धा करावी लागते आहे. वाहतुकीचे अंतर अधिक असल्यामुळे उसाच्या वाहतुकीचा खर्चही साखर कारखान्याला अतिरिक्त सोसावा लागतो आहे. त्या उलट साखरेचा भाव दिवसेंदिवस कमी होतो आहे. शिल्लक असलेली साखर विकण्यासाठी खरेदीदारांच्या मिनतवाऱ्या काढण्याची पाळी साखर कारखानदारांवर येत आहे. शेतकऱ्याला उसाचा पहिला हप्ता १८०० रुपये प्रतिटनने का होईना तो त्वरित द्यावा लागत असल्यामुळे कारखाने चांगलेच अडचणीत आले आहेत.
हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना नाराज करणे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. कारखान्यांना आíथक मेळ घालणे अतिशय कठीण झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा अतिशय परीक्षेचा काळ आहे. उस लागवड क्षेत्र कमी असणारे व मनुष्यबळही कमी आहे असे ऊस उत्पादक साखर कारखान्याला थोडा भाव कमी मिळाला तरी ऊस देणे पसंत करतात मात्र ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे असे ऊस उत्पादक गूळ तयार करणे पसंत करत आहेत. साखर कारखान्यांप्रमाणे शेतकऱ्यांकडून उसाची नगदी भावात खरेदी करून त्यापासून गूळ तयार करून विकणारे नवे उद्योजक बाजारपेठेत उतरले असल्यामुळे आता कारखान्यांना या उत्पादकांशीही स्पर्धा करावी लागते आहे.
राज्यात लातूर, सांगली, कोल्हापूर या तीनच गुळाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. अन्य बाजारपेठा मोठय़ा असल्या तरी त्या थेट शेतकऱ्यांच्या बाजारपेठा नाहीत. त्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी – विक्री होते. उसाचे क्षेत्र कमी झाले असले तरी याहीवर्षी दरवर्षीप्रमाणेच लातूर बाजारपेठेत दररोज १५ हजार ते २० हजार गुळाच्या डागाची आवक असल्याची माहिती लातूर जिल्हा गूळ असोसिएशनचे अध्यक्ष ललितभाई शहा यांनी दिली. दररोज आवक वाढते आहे. साखरेच्या प्रमाणात गुळाचा भाव सध्या चढा असून या भावात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर बाजारपेठेत येणाऱ्या गुळापकी ८० टक्केगूळ हा काळा तर २० टक्के गूळ पिवळा असतो. घरगुती खाण्यासाठी पिवळा गूळ हा उच्चप्रतीचा म्हणून वापरण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यासाठी जास्त पसे देण्याची तयारीही ग्राहकांची आहे. ऊस नीट पोसला न जाणे, जमिनीचा पोत, आदी कारणांमुळे काळा गूळ तयार होतो. हा गूळ बहुतांशी हातभट्टी (दारू) तयार करण्यासाठी वापरला जातो. लातूर बाजारपेठेतील सर्वाधिक काळा गूळ गुजरात प्रांतातील अहमदाबाद, मेहसाना आदी ठिकाणी जातो. काळय़ा गुळास ‘गुजरात चलन’ असेच नामाभिधान बाजारपेठेत झाले आहे. गुजरातेत असलेल्या दारूबंदीमुळे हातभट्टीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळे ही मागणी वाढली असल्याचे बाजारपेठेतील जाणकारांचे म्हणणे आहे. विदर्भातील ग्रामीण भागात आजही साखरेशिवाय गुळाचाच चहा पिण्याची पद्धत असल्यामुळे तिकडेही हा गूळ वापरला जातो.

ऊस शेतकऱ्यांना गुळात रस!
गेल्या आठवडय़ात २३०० रुपये िक्वटलने साखर विकली गेली. प्रत्यक्षात उसाला प्रतिटन २००० ते २१०० रुपयांपेक्षा साखर कारखाने अधिक भाव देऊच शकणार नाहीत हे लक्षात आलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा गूळ उत्पादन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गुळाचा भाव २३७० रुपये ते २५५० रुपये प्रतििक्वटल असा ठोक बाजारपेठेत आहे. एक टन उसापासून १२५ किलो गूळ तयार होतो. गूळ तयार करण्याच्या खर्चापोटी २५ किलो गुळाची रक्कम सरासरी लागते. उसापासून गूळ तयार केला तर शेतकऱ्यांना प्रति टन ३०० ते ४०० रुपये कारखान्यापेक्षा जास्त मिळत असल्यामुळे गूळ उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 7:10 am

Web Title: jaggery expensive than sugar
टॅग : Buisness News
Next Stories
1 निर्गुतवणूक आता खरेदीदारांच्या शर्तीवर?
2 ध्वनिलहरी परवाने लिलाव : सरकारला उद्दिष्टापेक्षा अधिक प्राप्ती
3 मंथली इन्कम प्लॅन्स
Just Now!
X