जानेवारीच्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यात गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीसह तेथे पर्यटन हंगामालाही बहर सुरू झाला आहे. कमी प्रमाणात का होईना खोऱ्यातील पर्यटकांची वर्दळ पूर्ववत होत असल्याचे दिसत आहे, परंतु विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशांतर्गत पर्यटकांचे आगमन अद्याप अपेक्षेप्रमाणे नसल्याची बाब जम्मू-काश्मीरचे पर्यटन संचालक महमूद शाह यांनी येथे शुक्रवारी बोलताना स्पष्ट केली.

नव्वदीतील दहशतवादी हिंसाचाराच्या सुरुवातीपासून गेल्या दोन दशकांत अनेक चढ-उतार अनुभवणाऱ्या येथील पर्यटन क्षेत्राच्या पुनर्उभारीसाठी जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना, शाह यांनी काश्मीर खोऱ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशा सुविधा आणि भ्रमंतीस पूरक शांततेचे वातावरण असल्याची ग्वाहीही या निमित्ताने दिली. किंबहुना २०१६ सालाच्या पूर्वार्धात या क्षेत्राने आजवरची सर्वाधिक पर्यटक संख्या अनुभवली आणि महाराष्ट्रातील येणाऱ्या पर्यटकांचा त्यात मोठा वाटा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत नुकतेच जम्मू-काश्मीरमधून परतलेल्या मुंबईतील मुख्य सहल आयोजक कंपन्यांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. तेथे राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या विशेष व्यवस्था आणि गोंडोला केबल कार तसेच गुलमर्ग स्किइंग अशा पर्यटकांना आकर्षति करणाऱ्या सुविधांचा अंदाज यावा म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी त्या राज्याच्या पर्यटन विभागाने महाराष्ट्र, गुजरात, कोलकाता आणि दिल्लीतील आघाडीच्या २५ सहल आयोजकांना निमंत्रित केले होते. त्यात मुंबईतून केसरी टुर्स, राजा-राणी ट्रॅव्हल्स, हिना ट्रॅव्हल्स आदींचा सहभाग होता.

गेली कैक वर्षे काश्मीर खोऱ्यातील सहलींसाठी प्रसिद्ध केसरी टुर्सचे केसरी पाटील यांनी, श्रीनगर, गुलमर्ग, पेहलगाम ही मराठी माणसाची संस्मरणीय सहलीसाठी पसंतीची ठिकाणे राहिली आहेत असे याप्रसंगी सांगितले. गेली दोन दशके राष्ट्रीय हिताच्या भावनेतून तेथे फिरायला जाणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वातावरण सध्या खूपच सुधारले असल्याचा त्यांनी दावा केला.