क्लब्स, डिस्कोथेक्समध्ये आजकाल पाटर्य़ाची रंगत आणि रौनक ही डिस्क-जॉकी अर्थात डीजेच्या सांगीतिक अदाकारीशिवाय पूर्ण होत नाही. १९९४ साली जगातील डीजेसाठी पहिला सीडी प्लेयर प्रस्तुत करणाऱ्या जपानच्या पायोनियर कॉर्पोरेशनला याची पुरेपूर कल्पना असून, भारतातील वधारत असलेला डीजे आणि क्लब व्यवसाय पाहता, या अग्रेसर कंपनीने डीजेंसाठी तंत्र-सांगाती ठरतील अशा प्लेयर्स, डीजे कंट्रोलर, मिक्सर्स, टर्नटेबल्स स्पीकर्स आणि हेडफोन्सची विस्तृत श्रेणी मुंबईत बुधवारी प्रस्तुत केली. पायोनियर इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक तोशियूकी शिन्डो आणि जागतिक विक्री विभागाचे महासंचालक सातोशी नित्ता यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या उत्पादनांचा वापर आणि किफायतशीरता यानुसार, प्रोफेशनल, परफॉर्मन्स आणि अॅफॉर्डेबल असे तीन वेगवेगळे वर्ग असून, हौशी डीजेंचे व्यावसायिक डीजेंपर्यंतच्या संक्रमणासाठी पायोनियरने दिलेली ही तंत्र सादच असल्याचे शिन्डो यांनी सांगितले.