फिरोदिया एंटरप्रायझेसचा भाग असलेल्या पुणेस्थित जय हिंद इंडस्ट्रीज लि.ने ऑटोमोटिव्ह सिलिंडर हेड्सच्या निर्मितीसाठी दक्षिण आफ्रिकेतील माँटूपेट एस. ए. या कंपनीशी संयुक्त भागीदारीची घोषणा केली आहे. या संयुक्त प्रकल्पातून उत्पादित घटकांच्या देशांतर्गत वाहन उद्योगाला पुरवठय़ाबरोबरीनेच चीन, आग्नेय आशिया आणि आखाती देशात निर्यातीचेही उभय कंपन्यांचे नियोजन आहे.
वाहनांसाठी महत्त्वाच्या सुटय़ा भागांच्या अत्यंत किफायतशीर निर्मितीसाठी जय हिंद इंडस्ट्रीजचा लौकिक राहिला आहे, तर माँटूपेटकडे असलेल्या तंत्रज्ञानात्मक व अभियांत्रिकी सामर्थ्यांचा मिलाफ हे या भागीदारीचे फलित असेल, असे या प्रसंगी बोलताना जय हिंद इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले. त्यांनी आणि माँटूपेटचे अध्यक्ष व मुख्याधिकारी स्टिफन मॅग्नन यांनी या संबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आशिया खंडात माँटूपेटचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही भागीदारी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मॅग्नन यांनी व्यक्त केला.