डिसेंबर २०१४ अखेरीस कंपनीकराची विविध कंपन्यांकडे ३.११ लाख कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती संसदेत देण्यात आली. अप्रत्यक्ष कराची मागणी १.५४ लाख कोटी असून एकूण प्रलंबित प्रत्यक्ष कर हा डिसेंबर २०१४ अखेर ३,११,०८० कोटी आहे.
अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एकूण कराची थकबाकी ३१ जानेवारी २०१५ अखेर १,५४,७०२.३६ कोटी आहे.
करचुकवेगिरीवर काय कारवाई केली, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अबकारी व सीमा शुल्क मंडळ तसेच प्रत्यक्ष करमंडळ हे संबंधितांवर कारवाई करतील. त्यात कर चुकवणाऱ्यांची माहिती वेगवेगळ्या स्रोतांकडून घेतली जाते, छाननी केली जाते व इतर देशात पैसा ठेवून करचकुवेगिरी करणाऱ्यांची चौकशी केली जाते, आंतरराष्ट्रीय कर नियमांचे पालन केले की नाही हे बघितले जाते.
नवीन कर मानके १ एप्रिल २०१५ रोजी जाहीर केली जातील. उत्पन्न मोजणी व ते जाहीर करण्याच्या नवीन पद्धती १ एप्रिलपासून अमलात येतील व त्या २०१६-१७ या वर्षांसाठी लागू राहतील. नवीन कर गणन पद्धती व ते जाहीर करण्याची पद्धती यांची मानके वेगळी असतील व करनिर्धारणात सातत्यचे धोरण असेल, असे त्यांनी सांगितले.