जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्जयोजनेचे बँकांना आर्जव

पंख गमावलेली नागरी विमान वाहतूक सेवा जेट एअरवेजच्या भवितव्य टांगणीला लागलेल्या २२,००० कर्मचाऱ्यांना सध्याच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बँकांकडून विशेष कर्ज योजना सुरू केली जावी, असे आवाहन बँक कर्मचारी संघटनेकडून करण्यात आले आहे. गेले काही महिने वेतनाविना काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.

देशातील वाणिज्य बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘भारतीय बँक महासंघ (आयबीए)’ला लिहिलेल्या पत्रात बँक कर्मचारी संघटनेने ‘जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांची सध्याची आर्थिक हलाखी पाहता आपल्या सदस्य बँकांना विशेष कर्ज योजना तयार करण्यास सूचित करावे,’असे आर्जव केले आहे. निदान कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन चुकते करण्यासाठी बँकांनी सुयोग्य तारणाच्या मोबदल्यात त्रस्त विमान सेवेला केवळ त्याच कारणासाठी वापरात येईल असे विशेष कर्ज तरी द्यावे, असेही या पत्रात सुचविण्यात आले आहे.

गेल्या आठवडय़ात बँक कर्मचारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित करण्यासाठी जेट एअरवेजला सरकारने ताब्यात घ्यावे, असे पत्राद्वारे आवाहन केले होते. गेल्या आठवडय़ात परिचालनाचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक ४०० कोटी रुपयांचा तातडीचा निधी देण्यास कर्जदात्या बँकांनी नकार दिल्याने २५ वर्षे कार्यान्वयन सुरू असलेल्या जेट एअरवेजची सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उड्डाणे अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली. जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी विनय दुबे यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या एक महिन्याच्या वेतनाचा खर्च म्हणून १७० कोटी रुपयांची गरज आहे.

तातडीचा तोडगा म्हणून सप्ताहअखेर नवी दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांना एक शिष्टमंडळ भेटले. त्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जेटचे मुख्य कार्यकारी विनय दुबे, वैमानिक, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. जर तातडीने कोणताही व्यवहार्य तोडगा नाही निघाल्यास सरकारने या हवाई सेवेचा ताबा घ्यावा अथवा तिचे एअर इंडिया या सार्वजनिक सेवेत विलीनीकरण करावे, असेही बँक कर्मचारी संघटनेने केंद्राला आवाहन केले आहे. वेगवेगळ्या पुरवठादारांचे सुमारे ४,००० कोटी रुपयांची भाडे व देणी जेट एअरवेजने थकविली आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन, तसेच आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना रद्दबातल उड्डाणांसाठी परतफेडीची रक्कम म्हणून आणखी काही हजार कोटी रुपयांचे या विमान सेवेवर दायित्व आहे. जेटला कर्ज देणाऱ्या सात बँकांच्या स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील संघाने या विमान सेवेचा मालकी हिस्सा विक्रीच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तथापि ही प्रक्रिया पूर्णत्वास जायला महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

समभागाचे घसरण सत्र सुरूच

जेट एअरवेजच्या समभागांचे शिरकाण भांडवली बाजारात सुरूच आहे. सोमवारी ‘बीएसई’वर व्यवहार प्रारंभीच समभाग गुरुवारच्या तुलनेत १९.३४ टक्के गडगडून १३२.२० रुपयांवर लोळण घेताना दिसला. उत्तरार्धात सावरत, ५.६७ टक्के नुकसानीसह तो १५४.६० रुपये पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

झैदी संचालक मंडळावरून पायउतार

जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे माजी सचिव म्हणून कारकीर्द राहिलेले नसीम झैदी यांनी सोमवारी राजीनामा दिला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची जेट एअरवेजचे बिगर-कार्यकारी आणि बिगर-स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वैयक्तिक कारणाने आणि वेळेच्या अनुपलब्धतेमुळे हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.