मुंबई : राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडून संकटग्रस्त जेट एअरवेजसंबंधाने सकारात्मक निकाल लागेल या अपेक्षेने समभागाचे मूल्य गुरुवारच्या व्यवहारात अभूतपूर्व अशा तीन अंकी प्रमाणात उसळले. राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहारा दरम्यान ८२.७५ रुपयांपर्यंत झेपावलेला जेटचा समभाग दिवसअखेर १२२.२० टक्के वाढीसह ७३.५५ रुपयांवर स्थिरावला. विशेष म्हणजे गुरुवारी त्याचा २६.५५ रुपयांचा नीचांक स्तर राहिला.

मुंबई शेअर बाजारातील व्यवहारा दरम्यान १३३.६८ टक्क्यांपर्यंत झेप घेणारा जेटचा समभाग सत्रअखेर बुधवारच्या तुलनेत ९३.३५ टक्क्यांनी वाढून ६४ रुपयांवर थांबला. येथे त्याचा २७ रुपये हा सत्रतळ ठरला. जेट एअरवेज गेल्या १३ सत्रांमध्ये निरंतर पडझड सुरू असून, या काळात तो ७८ टक्क्यांपर्यंत गडगडला आहे. समभागाचे भांडवली बाजारातील व्यवहार येत्या २८ जूनपासून ‘टी २ टी’ श्रेणीत सुरू होत आहेत.