30 May 2020

News Flash

‘जेट’अखेर पंखहीन ; बँकांकडून तातडीचा निधी देण्यास नकार

जेटचे शेवटचे उड्डाण बुधवारी रात्री १०.३० वाजता अमृतसरहून दिल्लीकरिता झाले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : ‘जॉय ऑफ लिव्हिंग’ हे ब्रीद गेल्या अडीच दशकांपासून जोपासणाऱ्या जेट एअरवेजने बुधवारी मध्यरात्री शेवटच्या उड्डाणासह देशातील नागरी हवाई वाहतूक व्यवसायावर शेवटाचा पडदा टाकला. चार महिन्यांपासून कर्मचारी, वैमानिकांचे मासिक वेतन देऊ न शकलेल्या जेट एअरवेजवर व्यापारी बँकांनी तातडीचे अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्याने उड्डाणे थांबविण्याची वेळ आली.

विविध २६ बँकांचे ८,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविलेल्या जेट एअरवेजने कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरू असल्याने काही उड्डाणे तात्पुरती रद्द केली होती. बँकांच्या सलग दोन दिवसांच्या बैठकीत कंपनीला नव्याने तातडीचे अर्थसहाय्य न देण्याचा निर्णय झाल्याने अखेर उरलीसुरली उड्डाणेही थांबविण्याचे पाऊल कंपनीने उचलले. जेटचे शेवटचे उड्डाण बुधवारी रात्री १०.३० वाजता अमृतसरहून दिल्लीकरिता झाले.

कंपनीची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच रद्द करण्यात आली आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. कंपनीतील २०,००० कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून नियमित वेतन मिळत नाही. इंधन पुरवठादार कंपन्यांनीही जेटच्या विमानांसमोर अडथळा निर्माण केला होता. इंधनाचे पैसे न मिळाल्याने सरकारी तेल कंपन्यांनी जेटचा इंधन पुरवठा बंद केला होता.

१९९३ मध्ये अस्तित्वात आलेल्या जेट एअरवेजमध्ये सहारा एअरलाईन्सचे २००७ विलिनीकरण झाले. प्रवासी संख्येबाबत देशातील एअर इंडियानंतरची देशातील दुसरी कंपनी म्हणूनही जेटचा उदय झाला.

जेटचे मुख्य प्रवर्तक नरेश गोयल हे कंपनीच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. स्टेट बँकेने कंपनीतील हिस्सा वाढविण्यासह १,५०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते पत्नीसह संचालक मंडळापासून दूर झाले.

नोव्हेंबर २०१८ मध्ये १२४ विमाने ताफ्यात असलेल्या जेट एअरवेजने अर्थविवंचनेनंतर तिची आंतरराष्ट्रीय उड्डाणे गेल्या आठवडय़ापासूनच बंद केली होती. ती येत्या शुक्रवापर्यंत बंदच असतील, असेही जाहीर केले होते. तर कंपनीची देशांतर्गत उड्डाणे सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर-पूर्व तसेच दक्षिणेतील शहरांकरिता कमी केली. परिणामी कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या मंगळवापर्यंत पाचपर्यंत येऊन ठेपले. बुधवारच्या निर्णयाची माहिती कंपनीने नागरी हवाई महासंचालनालयाला कळविली आहे.

जेट एअरवेज ही भारतातील सर्वात जुनी खासगी विमान कंपनी आहे. कंपनीचे पहिले विमान ५ मे १९९३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान उडाले होते. नियमिततेत कंपनीची दिवसाला ६०० उड्डाणे होत. १९९० च्या दशकात आलेल्या खासगी विमान कंपन्यांपैकी जेट एअरवेज ही गेल्या तीन दशके तग धरलेली एकमेव कंपनी होती. कंपनीने स्वत:हून उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांना माहिती मोबाइल संदेश तसेच इमेलद्वारे करून देत असल्याचे स्पष्ट करतानाच हिस्सा विक्री प्रक्रियेबाबतची आशा व्यक्त केली आहे.

पाच वर्षांत सात सेवा नामशेष..

गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर या सेवा जमिनीवर आल्या आहेत. तर १९९१ सालच्या उदारीकरणानंतर आलेल्या व तीन वर्षांतच बंद पडलेल्या ईस्ट वेस्ट एअरलाईन्सनंतर बंद पडलेली जेट एअरवेज ही १३ वी कंपनी ठरली आहे. याच दरम्यान दमानिया एअरवेज, मोदीलिफ्ट या हवाई कंपन्या आल्या व तीन वर्षांत त्या बंदही पडल्या. मोदीलिफ्ट ही नंतर अजय सिंग यांनी खरेदी करत २००५ मध्ये तिचे नामांतर स्पाईसजेट असे केले. तर त्याआधीपासून देशात सहाराची सेवा सुरू होती. तसेच २००३ पासून कॅप्टन गोपीनाथ यांची डेक्कन एअरवेज होती. तीदेखील पुढे पाच वर्षांतच किंगफिशर एअरलाईन्समध्ये विलिन झाली. पुढे २०१२ मध्ये किंगफिशरनेच गाशा गुंडाळला आणि तिचा कर्जबुडवा प्रवर्तक विजय मल्या विदेशात परागंदा झाला.

‘जेट’अस्ताचे परिणाम काय?

* २०,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार

* बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज टांगणीला

* पहिला तिमाही तोटा : जानेवारी-एप्रिल २०१८ पासून

* थकीत कर्मचारी वेतन : ऑगस्ट २०१८ पासून

* विमान ताफा १२६ वरून जेमतेम पाचवर ;

* दैनंदिन उड्डाणे ६०० वरून ३७ वर येत अखेर गाशा गुंडाळला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2019 2:34 am

Web Title: jet airways temporarily shuts operations as banks refuse emergency funds
Next Stories
1 जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांविरोधात लोकशाही प्रतिरोध दुर्लक्षिला जाऊ नये – रघुराम राजन
2 रिलायन्सच्या पेट्रोलियम व्यवसायात ‘सौदी आराम्को’ला स्वारस्य
3 विप्रोकडून पुन्हा एकदा समभाग पुनर्खरेदी!
Just Now!
X