आर्थिक चणचणीवर उपाय

मुंबई : मोठय़ा कर्जभाराने आर्थिक स्थिती डगमगलेली जेट एअरवेज आपल्या मालकीची सात विमाने भाडय़ाने देण्याच्या तयारीत आहे. याबाबत ट्रजेट या हवाई सेवेबरोबर कंपनीच्या वाटाघासाठी सुरू असल्याचे समजते.

खर्चात कपातीबरोबरच महसूल वाढीकरिता जेट एअरवेज हे पाऊल उचलणार असल्याचे समजते. ही सात विमाने काही कर्मचारी तसेच देखभाल आणि विमाछत्रासह दिली जाण्याची शक्यता आहे.

जेट एअरवेजच्या ताफ्यात एटीआर जातीची सध्या १५ विमाने आहेत. ट्रजेटबरोबरचा भाडेकराराचा व्यवहार चालू महिनाअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्रजेटबरोबर हा व्यवहार नजीकच्या भविष्यात आणखी अधिक विमानांसाठी  आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी होण्याची शक्यता आहे.

या व्यवहाराबाबत जेट एअरवेजने अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्टीकरण दिले नसले तरी ट्रजेटच्या प्रवक्त्याने मात्र तशी शक्यता वर्तविली आहे. तूर्त सात विमाने अल्प कालावधीसाठी भाडय़ाने घेतली जाण्याचा पर्याय असल्याचे या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

आखातातील कंपनी एतिहादबरोबर भागीदारी असलेल्या जेट एअरवेजने मार्च २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीत १,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे.

तिमाही निकालाला  २७ ऑगस्टचा मुहूर्त

एप्रिल-जून तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणे लांबणीवर टाकणाऱ्या जेट एअरवेजने आता त्यासाठी २७ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक त्या दिवशी होणार असून त्यातच जून २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीचे वित्तीय कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. पूर्वनियोजित सूचनेप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी कंपनीचे तिमाही निष्कर्ष जाहीर होणार होते.

शेअर बाजाराकडून विचारणा

ट्रजेटबरोबरच्या संभाव्य व्यवहाराबाबत भांडवली बाजाराने जेट एअरवेजकडे विचारणा केली आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या जेट एअरवेजला या व्यवहाराची कल्पना बाजाराला देणे नियमानुसार आवश्यक आहे. मात्र  माध्यमांमध्ये त्यावर चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराने शुक्रवारी कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले. या बातमीच्या परिणामी शुक्रवारच्या एकाच व्यवहारात कंपनीचे समभाग मूल्य ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचेही दिसले. बाजाराने शंका उपस्थित करण्यामागे हेही कारण आहे. चालू वर्षांत जेट एअरवेजच्या समभागाचे मूल्य जवळपास ६५ टक्क्य़ांनी खालावले आहे.