18 November 2019

News Flash

जेट अखेर दिवाळखोरीत

हिस्सा खरेदीसाठी एकच प्रस्ताव आल्याने स्टेट बँकेचे पाऊल

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असलेल्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीसाठी केवळ एकच प्रस्ताव आल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध हवाई कंपनी दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय अखेर स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला.

जेट एअरवेजला ८,००० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या व्यापारी बँकांचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने ही भूमिका स्पष्ट केली आहे. धनकोंच्या बैठकीत जेटबाबतचा हा निर्णय झाल्याचे बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले.

जेटच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे. जेटमधील हिस्सा खरेदीकरिता केवळ एकाच कंपनीने स्वारस्य दाखविल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असेही सांगण्यात आले.

थकीत कर्जाची रक्कम वाढल्याने तसेच अतिरिक्त कर्जाकरिता व्यापारी बँकांनी पाठ फिरवल्याने जेट एअरवेजने बरोब्बर दोन महिन्यांपूर्वी, १७ एप्रिल रोजी उड्डाणे बंद केली होती. यामुळे समूहातील २२ हजार कर्मचाऱ्यांच्या बेरोजगारीला सामोरे जावे लागले.

आता नव्या प्रक्रियेत कंपनी खरेदीसाठी उत्सुकांना न्यायाधिकरणापुढे प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. या प्रक्रियेत सध्या एस्सार स्टील, रुची सोया आदी कंपन्या प्रगतीपथावर आहेत. नादारी व दिवाळखोर संहितेंतर्गत न्यायाधिकरणाच्या मंचावर कर्जबुडव्या कंपन्यांचा मार्ग तडीस जाण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

जेटच्या विरोधात यापूर्वीच शमन व्हील्स व गग्गर एंटरप्राइजेस यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. जेटकडे या दोन कंपन्यांचे अनुक्रमे ८.७४ कोटी व ५३ लाख रुपये थकीत आहेत. याबाबत सुनावणी २० जून रोजी होईल. याबाबतही संबंधित कंपन्यांनी जेटला नोटीस पाठवावी, असे राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरण लवादाने बजाविले आहे.

सुमारे २५ वर्षे जुन्या जेटमधील हिस्सा खरेदीकरिता प्रवर्तक तसेच संस्थापक नरेश गोयल यांचीही तयारी होती. मात्र कंपनीतील एक भागीदार एतिहादनेच या प्रस्तावाला विरोध केला होता. नंतराच्या टप्प्यात हिंदूुजा समूहानेही कंपनीत रस दाखविला. मात्र गेल्याच आठवडय़ात समूहाने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

समभागमूल्यातील आपटी कायम

गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या जेट एअरवेजचे मूल्य सोमवारी १६.७६ टक्क्य़ांनी घसरून ६८.३० रुपयांवर स्थिरावले. व्यवहारात त्याने शुक्रवारच्या तुलनेत १९.५६ टक्के आपटी नोंदविताना ६६ रुपये हा बहुवार्षिक तळही नोंदविला. सलग ११ व्यवहातील आपटीने त्याचे मूल्य निम्म्यावर आले आहे. कंपनीच्या समभागांचे येत्या २८ जूनपासून भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत.

First Published on June 18, 2019 1:16 am

Web Title: jet is finally bankrupt
Just Now!
X